ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या महिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे या महिलेची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत टीका केली.

“सरकार नपुंसक या न्यायालयाच्या टिपणीची प्रचिती आली”

“गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक शब्द वापरल्याचं मी ऐकलं. त्याची प्रचिती काल आपल्याला आली आहे. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कुणाकडून काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. ठाण्याची ओळख महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं अशी आहे. पण ती पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. आता महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडगिरी करायला लागल्या तर देशाचं, राज्याचं, ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनातला प्रश्न आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“याचा अर्थ त्यांनी काहीही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असा नाही. आत्ता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून दऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले, तर ही गुंडगिरी उपटून टाकतील”, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

“आपल्याला एक फडतूस गृहमंत्री लाभलाय”, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र; म्हणाले, “लाचार, लाळघोटेपणा..”

“सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटल्यानंतर महिला गुंडांकरवी हल्ला करवणारे हे नपुंसकच म्हटले पाहिजेत. मी आयुक्तालयात गेलो तर आयुक्तच तिथे नाहीयेत. त्या रोशनीनं नावंही दिली आहेत की कुणी कुणी हल्ला केला. व्हिडीओत सगळं रेकॉर्ड झालंय. रोशनी मातृत्वासाठी उपचार घेत होती. ती हात जोडून सांगत होती की लांबून बोला. तरी तिला पोटात लाथा मारण्यात आल्या. हे निर्घृण काम करणारी माणसं ठाण्यात काय, महाराष्ट्रात राहायच्यालायकीची नाहीयेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.

“गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा”

“पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे सर्वोच्च न्यायालय म्हणतंय तसे नपुंसक नाहीयेत. जर मनात आणलं तर आत्ता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उखडून टाकण्याची जिद्द, हिंमत दाखवणारे शिवसैनिक, ठाण्याचे नागरिक आजही ठाण्यात आहेत. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. आणि बिनकामाचे आयुक्त, फक्त पदासाठी ते लाचारी करणार असतील, तर त्या आयुक्तांनाही सांगायचंय की तुम्ही घेतलेल्या शपथेशी ही प्रतारणा आहे. त्यांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा. एक कणखर आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवरही टीकास्र सोडलं.

“यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं”, उद्धव ठाकरेंचा ठाण्यातील राड्यावरून हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीसांमध्ये जर शरम असेल…”

“जर देवेंद्र फडणवीस खरंच गृहमंत्री असतील, लाळघोटेपणा करत नसतील, त्यांच्यात लाज, शरम असेल, हिंमत असेल तर ताबडतोब पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा. अद्याप साधा एफआयआर घ्यायला पोलीस तयार नाहीत. असे लाचार पोलीस रक्षणकर्ते होऊ शकत नाहीत. यात्रा ज्यांच्या नावाने काढतायत, त्यांचे विचार तुमच्या रक्तात नसतील, तर या फुकाच्या यात्रा काढू नका. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेलयात्रा करावी लागेल”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.