सोलापूर : पुणे जिल्ह्य़ात पडणाऱ्या दमदार पावसामुळे इकडे दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात गेल्या दोन दिवसांत २५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणात उणे पाणीसाठा होता. तो पार करून अधिक पाणीसाठा होऊ लागला. गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत त्यात आणखी भर पडून धरणातील पाणीसाठा अधिक २४.११ टक्के इतका झाला. सद्य:स्थितीत धरणात एकूण पाणीसाठा ७६.५७ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा १२.५७ टीएमसी इतका झाला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर थंडावल्यामुळे तेथून उजनी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही मंदावला आहे. कालपर्यंत धरणात सोडणाऱ्या पाण्याचा विसर्ग ५८ हजार क्युसेकपर्यंत होता. त्यात गुरुवारी घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी सायंकाळी बंडगार्डन येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग २२ हजार ५५ क्युसेक तर दौंड येथून धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग २४ हजार ३४८ क्यसेकपर्यंत होता.
उजनी धरणात उपयुक्त पाण्याची टक्केवारी २४.११ एवढी झाली असताना तेथील पाणीपातळी ४९२.७४० मीटर तर एकूण पाणीसाठा २१६८.६९ दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त पाण्याचा साठा ३६५.७८ दलघमी इतका नोंदविण्यात आला. सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या दोन महिन्यांत पावसाने निराशाच केली आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात सरासरी २०६ मिलीमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ ९७.४० मिमी म्हणजे जेमतेम ४७.१८ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. गुरुवारी दुपारनंतर शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात पडलेल्या पावसाची नोंद १३ मिमीपर्यंत झाली आहे. पावसाची भुरभुर सुरू असताना काही भागात वारे सुटले होते. त्यात झाडे उन्मळून कोसळल्याच्या घटनाही घडल्या. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.