सांगोला तालुक्यातील जवळा येथे ग्रामदैवत श्री नारायणदेव व महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजिलेल्या कुस्ती मैदानावर युक्रेनचा डेमेस्ट्री रॉचनायक व रशियाचा मिशा डेकनको यांनी प्रतिस्पर्धी भारताच्या मल्लांना धूळ चारत उपस्थित सुमारे २० हजार प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली. भारतीय ऑलिम्पिक कुस्तीपटू नरसिंग यादव याने हरयाणाच्या नीरजकुमारला एकतर्फी लोळविले.
जवळा येथे दरवर्षी ग्रामदैवत नारायणदेव यात्रेत कुस्ती मैदान भरविले जाते. यंदाच्या कुस्ती मैदानाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. संयोजक श्रीकांत देशमुख यांनी नेटके नियोजन केले होते. यंदा भारतासह युक्रेन व रशियाच्या नामवंत मल्लांनी हजेरी लावून या कुस्ती मैदानाची प्रतिष्ठा वाढविली होती. युक्रेनचा आलिम्पिकवीर मिशा डेकनको व पंजाबचा भारत केसरी शमी कश्यप यांच्यात प्रथम क्रमांकाची व पाच लाख रुपये इनामाची कुस्ती झाली. ही लढत एकतर्फीच ठरली. मिशा डेकनको याने शमी यास ढाक मारून अवघ्या एका मिनिटात आसमान दाखविले. ही कुस्ती रंगतदार ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती निरस झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
तीन लाखांचे इनाम असलेली मॅटवर खेळविली गेलेली कुस्ती रशियाच्या डेमेस्ट्री रॉचनायकने जिंकली. त्याने भारताच्या गोपाल यादव (बनारस) याच्यावर मात केली. डेमेस्ट्रीने ही लढत १० विरुद्ध ० अशी एकतर्फी जिंकली. पहिल्या तीन मिनिटात त्याने घोटय़ातून पट काढून दोन गुणांची कमाई केली. नंतरच्या डावातही त्याने गोपालला मोळी डाव टाकून तीन वेळा फिरविले. यात त्याला सहा गुण मिळाले. पुढे १० विरुद्ध ० अशी एकतर्फी लढत जिंकत डेमेस्ट्रीने तमाम प्रेक्षकांना अभिवादन केले.
पाच लाख रुपये इनाम असलेल्या दुसऱ्या लढतीत मुंबईच्या नरसिंग यादव याने हरयाणाच्या नीरजकुमार याच्यावर पहिल्या तीन मिनिटातच १० विरुद्ध ० अशा एकतर्फी गुणफरकाने मात केली. ही लढत प्रेक्षणीय ठरेल, असा अंदाज होता. कारण दोन्ही मल्ल तुल्यबळ होते. सुरुवातीला खडाखडी होऊन दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु काही क्षणातच नरसिंग यादवने प्रभाव पाडला. एक लाखाच्या इनामाची कुस्ती कुर्डूवाडीच्या शिवराय कुस्ती संकुलाच्या संतोष सुतारने कोल्हापूरच्या मोतिबाग तालमीच्या शिवाजी पाटील यास चितपट केले. यावेळी महिलांच्याही कुस्त्या झाल्या. यावेळी हिंदकेसरी गणपत आंधळकर व दीनानाथसिंह यांच्यासह महाबली सत्पालसिंह, कर्तारसिंह, दादू चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कुस्ती मैदानाचे धावते सूत्रसंचालन शंकर पुजारी यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2015 रोजी प्रकाशित
युक्रेन, रशियाच्या मल्लांची भारतीय मल्लांवर मात
सांगोला तालुक्यातील जवळा येथे ग्रामदैवत श्री नारायणदेव व महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजिलेल्या कुस्ती मैदानावर युक्रेनचा डेमेस्ट्री रॉचनायक व रशियाचा मिशा डेकनको यांनी प्रतिस्पर्धी भारताच्या मल्लांना धूळ चारत उपस्थित सुमारे २० हजार प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली.

First published on: 28-02-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine russia wrestlers beat indian wrestlers