रस्त्याच्या जागेवरील आसारामबापू आश्रमाचे अतिक्रमण गुरुवारी महापालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविले. या वेळी साधकांनी हरकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना महापालिका यंत्रणेने जुमानले नाही. अतिक्रमण पाडण्याचे छायाचित्रण करू नये म्हणून साधकांनी छायाचित्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.
गोदावरीच्या काठावर गंगापूर रोड परिसरात आसारामबापू यांचा आश्रम आहे. या जागेतून जाणाऱ्या रस्त्याची जागा हस्तांतरित न करता आश्रमाने या ठिकाणी बांधकाम केले होते. याचबरोबर फार्म हाऊसच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचीही तक्रार आहे. नगररचना विभागाने आश्रमात जाऊन २४ मीटर रस्त्याच्या जागेची मोजणी केली होती. ही जागा त्वरित महापालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश महापौरांनी देऊनही संबंधितांकडून त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. यामुळे गुरुवारी अतिक्रमणविरोधी विभागाने रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारास विभागाचे पथक पोलीस बंदोबस्त घेऊन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर धडकले. याची कुणकुण लागल्याने काही वेळातच आश्रमात सुमारे २०० साधक जमा झाले. त्यात महिलांची संख्या अधिक होती. या मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सर्वाना समज दिली. पोलीस व महापालिका प्रशासनासमोर कोणताही निभाव लागणार नसल्याचे लक्षात आल्यावर साधकांनी आपला मोर्चा प्रसारमाध्यमांकडे वळविला. अतिक्रमणविरोधी पथकाने आश्रमातील शेड पाडण्यास सुरुवात केली. त्याचे छायाचित्रण करण्यास साधकांनी आक्षेप घेतला. आश्रमासाठी ज्या जागेचा वापर झाला आहे, ती फार्म हाऊसची जागा असल्याचे सांगितले जाते. यामुळे आश्रम अधिकृत की अनधिकृत याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.