scorecardresearch

सरकार पडेल या भ्रमात राहू नका !; भाजप सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यादव यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

महाराष्ट्रातील सरकार आज, उद्या पडेल या भ्रमात राहू नका. सत्तेची स्वप्ने पाहू नका, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन करीत पदाधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला.

प्रशांत देशमुख

वर्धा : महाराष्ट्रातील सरकार आज, उद्या पडेल या भ्रमात राहू नका. सत्तेची स्वप्ने पाहू नका, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन करीत पदाधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर येथे संपन्न झाले. सहाही जिल्ह्यांतील खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी शिबिरात हजर होते. राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याच्या घोषणा सातत्याने दिल्या जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नुकताच नवा मुहूर्त दिला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्याने दिलेला सल्ला चर्चेत आला.

पदाधिकाऱ्यांना संबोधताना शिवप्रकाश म्हणाले की, राज्यात सत्ता आता येत नाही. सरकार पडण्याची स्वप्ने पाहू नका. २०२४ चे लक्ष्य ठेवून कामाला लागा. आपण सरकार पाडण्याच्या भानगडीत नाही. लोकांना वाटेल तेव्हाच आपले सरकार येईल. प्रत्येक बूथवर ५१ टक्के मत भाजपला मिळेल, असा प्रयत्न करा. संघटनेचे जाळे मजबूत करा. एखादे बूथ कमकुवत असेल तर बूथ प्रमुखास बदलवू नका, त्याला मदत करा. वरिष्ठांची मदत घ्या. कार्यकर्त्यांची केवळ निवडणुकीपुरती आठवण ठेवू नका. त्याच्या व्यक्तिगत सुखदु:खात सहभागी व्हा. पाच वर्षे त्याला जपा. पक्षाच्या शक्ती केंद्रप्रमुखास ताकद द्या, सांस्कृतिक राष्ट्रवाद हा मुद्दा घेऊन पुढे जा. मोदी सरकारने अमलात आणलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांकडे लक्ष द्या. मोफत नळजोडणी, मुद्रा, धान्य वाटपाचे लाभार्थी असलेल्यांना संघटनेशी जोडा. इतर पक्षाच्या नाराज असलेल्या मोठय़ा नेत्यांवरच लक्ष केंद्रित न करता लहान कार्यकर्त्यांनाही भाजपशी जोडा. त्यांना किमान ग्रामपंचायत पातळीवर आपण जोडले पाहिजे. तरच ५१ टक्के मते भाजपला मिळतील, असा हितोपदेश शिवप्रकाश यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकांसाठी बैठका घ्या. त्याचा खराखुरा अहवाल संघटनेकडे सादर करा, अशी सूचना करतानाच त्यांनी १०० टक्के बूथ स्थापन करण्याचा आग्रहही धरला. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही सध्या राज्यात सत्ता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Under illusion government will fall bjp coalition minister shiv prakash yadav advice office bearers ysh

ताज्या बातम्या