वेगळे विदर्भ राज्य झाले, तर नक्षलवाद वाढेल, या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर विदर्भवाद्यांच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, वेगळ्या राज्याचा मुद्दा नक्षलवादी चळवळीशी जोडणेच मुळात योग्य नाही व वस्तुस्थितीला धरून नाही, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
गेल्या १६ ऑगस्टला चिमूरमध्ये हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी फेटाळून लावताना
‘हे राज्य झाले तर नक्षलवाद वाढेल,’ अशी भीती व्यक्त केली होती. लहान राज्यांमध्ये हिंसक चळवळी लवकर वाढू शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी
छत्तीसगड व झारखंडचे उदाहरण देत स्पष्ट केले होते. स्वतंत्र राज्याची मागणी उचलून धरणाऱ्या काही संघटनांनी निदर्शने करून या  विधानाचा जाहीर निषेध नोंदवला आहे, तर राज्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचे हे विधान मान्य नसल्याचे जाहीरपणे  सांगितले आहे. नक्षलवादी चळवळीचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांच्या वर्तुळाला सुद्धा मुख्यमंत्र्यांचा हा युक्तिवाद मान्य नाही. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध करणे एकदाचे समजून घेता येईल, मात्र या मागणीचा संबंध
थेट नक्षलवाद्यांशी जोडणे वस्तुस्थितीला धरून नाही, असे मत या वर्तुळात व्यक्त होत आहे. गेल्या तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या नक्षलवादी चळवळीचा प्रभाव प्रामुख्याने मध्य भारतातील जंगलांमध्ये आहे. अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या झारखंड व छत्तीसगड या भागात राज्य निर्मितीच्या आधी सुद्धा नक्षलवादी चळवळीचा प्रभाव होता. तेव्हाच्या मध्य प्रदेश व बिहारमध्ये १९८०  पासून ही चळवळ सक्रिय होती. विभाजन झाल्यानंतरसुद्धा दोन्ही राज्यांमध्ये चळवळ संपलेली नाही. उलट अलीकडच्या दहा वर्षांंत त्यात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशातील केवळ तेलंगणाच्या पट्टय़ातच नक्षलवादी चळवळ आहे असे नाही तर उर्वरीत आंध्र प्रदेशात ही चळवळ स्वातंत्र्याच्या पूर्वी पासून आपले अस्तित्व राखून आहे, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. तेलंगणाची निर्मिती झाली तरी या चळवळीचा प्रभाव कायम राहील, कारण मध्य भारतातील भौगोलिक स्थितीच तशी आहे असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

उत्तरांचल, मेळघाट लक्षात घ्या
छत्तीसगड व झारखंड सोबत उत्तरांचल या राज्याचीसुद्धा निर्मिती झाली. भरपूर जंगल व पर्वतीय प्रदेश असलेल्या या राज्यात नक्षलवादी चळवळ अजूनही मूळ धरू शकली नाही. ही वस्तुस्थिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माहीत नाही का? असा सवाल विदर्भ समर्थकांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या ३० वर्षांपासून पूर्व विदर्भात नक्षलवादी सक्रिय आहेत. भौगोलिक अडचणींमुळे नक्षलवाद्यांना अजून पश्चिम विदर्भातल्या मेळघाटात सुद्धा पाय रोवता आले नाही. त्यामुळे केवळ नक्षलवादाच्या मुद्यावर वेगळ्या राज्याची मागणी अव्हेरणे योग्य नाही अशी भूमिका विदर्ड्टावादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मांडली.