दापोली : दापोली पोलीस स्थानक हद्दीतील आंजर्ले व केळशी समुद्र किनारी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान सापडल्याने मोठी खळबळ उडाली. या मृतदेहांबाबत पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे.
आंजर्ले येथील गणपती विसर्जन पॉईंट येथील समुद्र किनारी सुमारे ५० वर्षे वयाचा नीला टी-शर्ट परिधान केलेला अर्धनग्न स्थितीतील पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही तसेच केळशी येथील बापू आळी पाठीमागे समुद्र किनारी सुमारे ५० वर्षे वयाचा पांढरा टी-शर्ट परिधान केलेला अर्धनग्न स्थितीतील पुरुष मृतावस्थेत सापडला असून या मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटण्याचे अनुषंगाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती दापोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश तोरस्कर यांनी दिली आहे.
दोन्ही पुरुष जातीचे मयत हे मच्छिमार व्यावसायिक असण्याची शक्यता असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मयताचा चौकशी पंचनामा करण्यात येऊन प्रकरणाची पुढील चौकशी दापोली पोलीस करित आहेत.