नांदेड : समान नागरी कायदा जर लागू झाला तर लौकिक जीवनातील धर्माचा प्रभाव कमी होईल, असे मत आंबेडकर व सावरकर जीवनाचे अभ्यासक तथा पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. नांदेड येथील समरसता साहित्य संमेलनामध्ये प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते. भरत आमदापुरे आणि स्नेहलता स्वामी यांनी रावत यांना सामाजिक समता, संविधान, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समस्या यााबाबत प्रश्न विचारले. यावेळी राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक डॉ. गोविंद नांदेडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द संविधानामध्ये कालांतराने म्हणजे आणीबाणीच्या वेळी घुसडविण्यात आले. ब्रिटीशांचे आगमन ही बाब भारतासाठी इष्टापत्ती ठरली. त्या काळात मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन झाले. अक्षरशः धर्म नाकारण्यापासून ते नवनवीन धर्म काढण्यापर्यंत सामाजिक सुधारकांनी काम केले. त्या काळात देशात आणि महाराष्ट्रात धार्मिकदृष्टया खूप मोठी वैचारिक घुसळण झाली. जणू काही समुद्रमंथनच झाले. हे सर्व काम प्रामुख्याने हिंदू धर्माबाबतच झाले, असे रावत यांनी सांगितले.

या समाज सुधारणेचा इस्लाम धर्मीयांवर फारसा परिणाम झाला नाही. जितकी चिकित्सा हिंदू धर्माची झाली, तितकी मुस्लीम धर्माची झाली नाही, या बाबीकडे रावत यांनी लक्ष वेधले. ब्रिटीशांच्या सुधारणा आणि समाजसुधारकांच्या कामामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळांमध्ये आजघडीला सुमारे ७५ हजार मुली शिक्षण घेत आहेत, असे ते म्हणाले.

संविधान आणि हिंदुत्व हे प्रबोधनयुगाचे अपत्य आहे. ब्रिटीशांच्या आगमनानंतर सुमारे एक हजार वर्षांनी हिंदू समाजात प्रचंड घुसळण झाली. संविधान हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांवर आधारित आहे. लोकशाहीच्या चौकटीतून राजकीय लोकशाही निर्माण करता येते. पण जोपर्यंत सामाजिक व आर्थिक समता येत नाही, तोपर्यंत समता येणार नाही, असे डॉ. आंबेडकर म्हणत असत, असे रावत यांनी सांगितले.

बंधुता – एकत्व हा राष्ट्रीय एकात्मतेचा गाभा आहे. ज्यांची गावकी एक आहे, त्यांची भावकी एकत्र करण्याची प्रक्रिया गेल्या शेकडो वर्षांपासून चालू आहे, असेही रावत म्हणाले.