सोलापूर : गेली नऊ वर्षे अन्नदान सेवेत असलेल्या ‘जयहिंदू फूड बँके’च्या वतीने सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात गरीब रुग्ण व नातेवाइकांना रोज जेवणाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर, बीड, बीदर, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट आदी भागातून गोरगरीब रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल होतात. अनेक वेळा हे रुग्ण आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाइकांची आर्थिक अडचणींमुळे दररोज पोटभर जेवणाअभावी आबाळ होते. ही अडचण लक्षात घेऊन ‘जय हिंदू फूड बँके’ने रुग्णालयात गरजू रुग्ण व नातेवाइकांसाठी रोजच जेवणाची सोय केली जात असल्याचे ‘जय हिंदू फूड बँके’चे संस्थापक-अध्यक्ष सतीश तमशेट्टी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या उपक्रमाचा प्रारंभ पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते झाला. या उपक्रमाचे स्वागत करून बैजल यांनी, शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी परगावातून येणारे बरेच गोरगरीब रुग्ण व नातेवाईक परिस्थितीने अक्षरश: गांजलेले असतात. दररोज जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. परंतु आपली अडचण ते बोलून दाखवू शकत नाहीत. त्यांच्या सेवेसाठी ‘जय हिंदू फूड बँके’ने हाती उपक्रम मानवतावादी आहे, असे उद्गार काढले. या वेळी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. विजय पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून त्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमासाठी जय हिंदू फूड बँक व रुग्णालय प्रशासन यांच्यात करार करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uninterrupted food donation service jayhindu food bank government hospital ysh
First published on: 04-03-2022 at 00:02 IST