देशात मोठय़ा प्रमाणावर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्टय़ा वैशिष्टय़े असलेली पर्यटनस्थळे असूनही त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारकडून व्यवस्थित माहिती व प्रसिद्धी केली जात नाही, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश रगडे यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयात हॉटेल आणि पर्यटन उद्योगातील ‘व्हिजन २०:२०’ या विषयावर आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. पर्यटनविषयक जगातील १८९ देशांच्या यादीत भारताचे स्थान बाराव्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा कितीतरी लहान असलेल्या मलेशियासारख्या मुस्लीमबहुल देशात मद्य, जुगार तसेच देहविक्रय व्यापारावर बंदी असतानाही मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येत असतात, असे डॉ. रगडे यांनी नमूद केले. याउलट आपल्या देशात प्राचीन वारसा सांगणाऱ्या वास्तू, अभयारण्य, गड-किल्ले, समृद्ध समुद्रकिनारा, ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची विपुलता असतानाही विदेशी पर्यटक फारसे येत नाहीत. पर्यायाने या माध्यमातून उपलब्ध होणारे परकीय चलन भारताला मिळू शकत नाही. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातही पर्यटनस्थळांच्या विकासाविषयी उल्लेख नसल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा आणि हवाई क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखल्याने त्याचा फायदा कोटय़वधी युवकांना होऊ शकेल, असा विश्वास डॉ. रगडे यांनी व्यक्त केला.
मुबईच्या बिग रेड टँटचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल मेहता यांनी विविध कारणांसाठी कशा प्रकारे पर्यटन केले जाते त्याची माहिती दिली. त्यातून रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होतील, हेही सांगितले. नाशिकच्या सुला वाइन्सचे अजय शॉ यांनी पर्यटनाच्या क्षेत्रात आगामी काळ देशाला कसा असेल, वाइन्सचे तंत्रज्ञान व विपणन यांविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागाचे सहसंचालक डॉ. नंदनवार यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. वैकुंठ चोपडे यांनी केले. या वेळी संस्थेचे समन्वयक प्राचार्य एस. आर. तांबे हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी मयुरी निनानी, मुग्धा निगुडकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
पर्यटनाच्या प्रसिद्धीत केंद्र सरकारची अनास्था
देशात मोठय़ा प्रमाणावर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्टय़ा वैशिष्टय़े असलेली पर्यटनस्थळे असूनही त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारकडून व्यवस्थित माहिती व प्रसिद्धी केली जात नाही, अशी
First published on: 24-02-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union government falls short to advertise tourism