Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result : राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघांपैकी परळी विधानसभा मतदारसंघही महत्वाचा मानला जात होता. भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परळीत सभा घेतली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. कारण, आज निकाल समोर आल्यानंतर परळीतून पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या मुंडे बहिण भावांमध्ये झालेली लढत मोठी लक्षवेधी ठरली होती. दरम्यान, हा निकाल आपल्यासाठी अनाकलनीय असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
परळीत विजयी झालेल्या धनंजय मुंडेंना एकूण १,०२,०४४ मतं मिळाली तर पंकजा मुंडे यांना ७३,८०८ मते मिळाली. त्यानुसार, २८,२३६ मतांनी पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, परळीतील निकाल अनाकलनीय असल्याचे सांगताना बीड जिल्ह्यातील राजकारणाचा कल आपल्या लक्षात आला आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मतदारांनी दिलेला कौल मान्य असून माझ्या पराभवासाठी मी कुणाला दोष देणार नाही. कार्यकर्त्यांनी शांत रहावं असे आवाहनही त्यांनी केले आहे. धनंजय मुंडेंनी भाषणादरम्यान पंकजा मुंडेंवर केलेल्या कथीत टिप्पणीवरुन राज्यभरात मोठा गदारोळ झाला होता. यावर भाष्य करताना या गलिच्छ राजकारणापासून जनतेने मुक्त व्हावं किंवा मला मुक्त करावं असं मी यापूर्वीच म्हटलं होतं असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
पाच वर्षांचा काळ मला सत्तेचा असल्याचे कधी वाटलेच नाही, कारण मी या काळातही प्रचंड संघर्ष केला, असेही त्यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.