अवकाळी पावसाचा धुमाकूळ शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूचा होता. संध्याकाळच्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणातील सगळा नूरच बदलून टाकला. पावसाचे टपोरे थेंब, मुसळधार जलधारा आणि जोराचा वारा असे एरवी पावसाळ्यातच दिसणारे चित्र शनिवारी औरंगाबादकरांनी अनुभवले. पावसाळ्यातच शोभून दिसणारा हा पाऊस वाटत असला, तरी या पावसाचा शेतीच्या दृष्टीने फायदा कमी, उलट नुकसानच अधिक असल्याने शेतकरी वर्ग अवकाळीच्या दणक्याने चांगलाच हबकून गेला आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड अशा सर्वच जिल्ह्य़ांत गेल्या काही दिवसांत कमी-अधिक फरकाने अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस तर हा पाऊस मुक्कामी आल्याप्रमाणेच डेरा टाकून बसला आहे. परतीचे नावही घेत नसलेल्या या पावसाच्या माऱ्याने दैनंदिन जनजीवन चांगलेच विस्कळीत करून टाकले आहे. शुक्रवारी संध्याकाळनंतर पैठण, वैजापूर, गंगापूर तालुक्यांच्या बहुतांश भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. अवकाळीच्या प्रकोपाने शेतीचे चित्र मोठे अस्थिर केले आहे. मोसमी पावसाने दगाफटका केल्याने खरीप व रब्बी दोन्ही हंगामांतील पिकांवर गंडांतर आले. शेतीचे अर्थकारण पुन्हा अनिश्चिततेत सापडले. शेतकरी पुरता कोलमडला. सरकारकडून शेतक ऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर होत नाही, तोच पुन्हा अवकाळी स्वरूपात पावसाने दणका दिला. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतीची उरली सुरली आशाही संपुष्टात येत चालली आहे. साहजिकच आधी पावसाअभावी व आता अवकाळी पावसानेच शेती व शेतक ऱ्यांना अनिश्चिततेत लोटले आहे. काढणीला आलेला गहू, कांदा, ज्वारी, हरभरा आदी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी झालेल्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी शनिवारी सकाळी प्रशासकीय यंत्रणेने सुरू केली. मात्र, संध्याकाळी पुन्हा पावसाने दमदार आगमन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain not to stop
First published on: 15-03-2015 at 01:56 IST