सावंतवाडी शहराच्या विपुल जैवविविधतेचे दर्शन घडविणाऱ्या शहराच्या नागरी पक्षी निवडणूक निकाल घोषित होऊन भारद्वाज (कुकुडकोंबा)ची निवड नगराध्यक्ष बबन साळगांवकर व मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी जाहीर केली. आता भारद्वाज पक्षी गॅझेटमध्ये नोंदविला जावा म्हणून प्रयत्न करतानाच शहर पर्यटन व पर्यावरणदृष्टय़ा विकसित करण्यात येणार आहे.
सावंतवाडी नगर परिषदेने सावंतवाडी शहराचा नागरी पक्षी निवडण्यासाठी मतदान घेतले. १ ते ११ मे या कालावधीत ५ हजार ४९४ मतदारांनी मतदान केले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्याने निसर्ग, पर्यावरणप्रेमींनी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांच्यासह नगरपालिकेचे कौतुक केले होते.
सावंतवाडी शहरात राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी नरेंद्र डोंगराची जैवविविधता आणि मोती तलावाचे सौंेदर्य पक्षीमित्रांच्या नजरेत भरले. त्यावेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी नवीन उपक्रमाची कल्पना प्रत्यक्षात रुजविण्याचे धोरण आखले. प्रथम मुंगूस प्राण्याला शहराचा प्राणी घोषित केले.
सावंतवाडी शहरात पश्चिम घाटात वावरणारा आकर्षक मलबार ट्रॅगॉन (कर्णा पक्षी) दिसत असल्याने या पक्ष्यासोबत शहरात ठिकठिकाणी दर्शन देणारा भारद्वाज (कुकुडकोंबा) यामध्ये मतदानस्वरूपात निवडणूक घेण्याचे ठरले. त्यासाठी १ ते ११ मे या कालावधीत मतदान घेण्यात आले.
शहरातील नगर परिषद कार्यालय, जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, जिमखाना जलतरण तलाव, फेसबुक, ट्विटर, गुगलवर मतदान घेतले. या मतदानाद्वारे पाच हजार ४९४ मतदान झाले. त्यातील ३५ मतदान अवैध ठरले. गुगलवर १४ मते, फेसबुकवर २२ मते मिळाली. अन्य चार ठिकाणी मतदान केंद्राद्वारे मतदान घेण्यात आले.
या दोन पक्ष्यांना पाच हजार ४५९ मतदान झाले. त्यातील ३५ मतदान अवैध ठरले. त्यामुळे पाच हजार ४९४ मतदानाची मोजणी केल्यावर भारद्वाज पक्ष्याला ४ हजार ६९, तर कर्णा पक्षाला एक हजार ३९० मते मिळाली. मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले, तर कर्मचाऱ्यांनी मतमोजणीचे काम केले.
यावेळी गुणांक ४ नुसार भारद्वाजला १६ हजार २७६, कर्णापक्षी ५ हजार ५६० मते मिळाली. एकूण वैध मते २१ हजार ९७६ आहेत असे जाहीर करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले, सावंतवाडी शहर पर्यटन व पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. हा एक वेगळा निसर्गाशी निगडित उपक्रम आहे. त्याला जनतेने दिलेला पाठिंबा लक्षात घेऊन यापुढेही निसर्गाशी निगडित उपक्रम हाती घेण्यात येतील.
यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक अनारोजीन लोबो, अॅड. सुभाष पणदूरकर, विलास जाधव, गोविंद वाडकर, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर, क्षीप्रा सावंत, योगीता मिसाळ, देवेंद्र टेंबकर, संजय पेडणेकर, अभय पंडित व मान्यवर उपस्थित होते.
भारद्वाज पक्षी नगर पक्षी बनल्याचे जाहीर करण्यात आल्याने मतदारांनीदेखील समाधान व्यक्त केले. हा पक्षी शहरात ठिकठिकाणी दिसतो. पश्चिम घाटात आढळणारा सौंदर्यवान कर्णा पक्षीला कमी मतदान झाले, तो सर्वाच्याच नजरेस पडत नाही असे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2016 रोजी प्रकाशित
सावंतवाडीचा नागरी पक्षी भारद्वाज
सावंतवाडी नगर परिषदेने सावंतवाडी शहराचा नागरी पक्षी निवडण्यासाठी मतदान घेतले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-05-2016 at 01:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urban birds project in sawantwadi