भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित करताच त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला. किती असेल त्याची व्याप्ती? मराठवाडय़ातील काही शहरात ‘मोदी लाओ, देश बचाओ’ चा नारा आता चक्क शंभर रुपयांच्या नोटेवर देण्यात आला आहे! अनेक नोटांवर पांढऱ्या भागात तसा तयार केलेला ‘शिक्का’ मारून मोदींचा करण्यात आलेला हा प्रचार नियमांचे उल्लंघन करणारा असला तरी अद्याप तरी यावर कोणी आक्षेप नोंदविलेले नाहीत.
नोटांच्या माध्यमातून होणारा मोदींचा प्रचार सध्या मराठवाडय़ात चच्रेचा विषय आहे. शंभराची नोट चलनात अधिक असल्याने त्यावर मारण्यात आलेले शिक्के रिझर्व बँकेच्या मागदर्शक तत्त्वानुसार गुन्हा ठरू शकतो, असे कायदा क्षेत्रातील मान्यवर सांगतात. एरवी प्रचारादरम्यान आमिष म्हणून वापरलेली नोट प्रचाराचे माध्यमच झाली आहे. बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत या नोटा प्रामुख्याने आढळून येत आहेत. पंतप्रधानपदाचे मोदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोदींच्या विरोधात आणि बाजूने बोलणाऱ्यांची फौजच टिवटिव करू लागली आहे. त्यातच नोटांद्वारे प्रचारांचे हे तंत्र ग्रामीण भागात पद्धतशीर पसरविले जात आहे. चलनावर काहीही लिहू नये, असे संकेत आहेत. अजून तरी या अनुषंगाने कोणाचाही आक्षेप घेतलेला नाही.