महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर भाष्य करणाऱ्या रामदास फुटाणे यांच्या वात्रटिकेसह समाजाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या अशोक नायगावकर यांच्या भाष्यकवितांनी हसता हसता रसिक अंतर्मुख झाले.
द्राक्षाच्या राजकारणाला
रुद्राक्षाने दणका दिला
भुईमुगाच्या शेंगा दाखवीत
भाकरीबरोबर झुणका दिला
अशा कवितांसह या दोन कवींच्या गप्पांमध्ये दीड तास कधी आणि कसा निघून गेला हे समजलेच नाही.
साहित्य संमेलनातील शनिवारच्या सकाळी झालेल्या सत्रात कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर यांच्याशी गप्पा मारल्या. वेगवेगळ्या विषयांवरील कवितांसह खुसखुशीत भाष्याने या कवींनी मैफल तर रंगविलीच. स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घेतलेल्या फिरकीमध्ये खुद्द तटकरेदेखील हास्यरंगात बुडाले.
कमीतकमी भांडवलाचा धंदा म्हणून कवितेकडे वळालो, अशी रामदास फुटाणे यांनी सुरुवात करताच हास्याचा धबधबा उसळला.
प्रेमाची, निसर्गाची कविता करायची नाही हे निश्चित होते. अवतीभोवती जे जळतेय, खटकतेय आणि सलतेय तेच कवितेतून मांडायचे हे ठरविले होते. राजकीय व्यंगकविता कधी द्वेषाने लिहिली नाही. त्यामुळे शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांसारख्या नेत्यांवर व्यंगकवितेतून टीका केली तरी हे नेते कधी रागावले नाहीत त्यांनी खिलाडूवृत्तीने माझ्या कवितेला दिलखुलास दाद दिली,  असेही रामदास फुटाणे यांनी सांगितले.
पुढच्या वर्षी साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी म्हणून मी या गंभीर कविता सादर करीत आहे, अशी प्रस्तावना करीत अशोक नायगावकर यांनी बहार उडवून दिली.
कवी हा द्रष्टा असतो, तो लांबचे बघत चालतो म्हणूनच खड्डय़ात पडतो. आपल्या राजकारणाचेही असेच आहे. दिल्ली बघायला गेला आणि महाराष्ट्र ताब्यातून गेला, या नायगावकरी टिप्पणीला टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
कवी हा कोणत्याही जाती-धर्माचा- वर्गाचा असता कामा नये, तरच त्याला समाजाकडे तटस्थपणे पाहता येते, असे सांगून रामदास फुटाणे म्हणाले, हास्य आणि व्यंगाच्या माध्यमातून हिंदी हास्य कविसंमेलन मी पाहिले आणि हाच प्रकार मराठी कविसंमेलनामध्ये आणला. शहरातील कवी खेडय़ात आणि खेडय़ातील कवी शहरातील कविसंमेलनात, असा उद्योग गेली २५ वर्षे सुरू आहे. साहित्यिक म्हणून मान्यता मिळो न मिळो, रसिकांना कवितेचा आनंद मिळणे हेच आम्हाला महत्त्वाचे वाटते.