महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं आम्ही समजू असंही ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रात सध्या राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचं दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे,” अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

पुढे ते म्हणाले की, “ज्याप्रकारे पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचं सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचं पत्र समोर आलं आहे. त्यामधून २३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचं दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल आम्हाला वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की मंत्रीमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे”.

आणखी वाचा- खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप

“त्यासंबंधीचा रिपोर्ट राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू कऱणं गरजेचं आहे. सभागृह बरखास्त करता कामा नये…कारण तिथे काही चांगले आमदार आहेत. नवं सरकार आलं तर गुन्हेगारी घटक बाहेर ठेवता येईल आणि नव्या व्यवस्थेने राज्य करता येईल अशी परिस्थिती आहे, जर रिपोर्ट गेला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं समजू,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण आहेत?; फडणवीसांचा पवारांना सवाल

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सचिन वाझे यांचा जबाब लोकांसमोर आणला पाहिजे अशी विनंती केली. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “मला शिकवण्याची गरज नाही. मी आता शिकण्याच्या परिस्थितीत नाही. ज्याला कोणाला शिकायचं असेल त्याने माझ्याकडे यावे. मी त्यांना बाबासाहेबांनी काय सांगितलं हे समजवून सांगतो”. “पोलीस आयुक्तांनी आरोप केले असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. अजून कोणाला काय पुरावा हवा असेल तर त्यांनी शोधावा. खंडणी द्या किंवा ठार मारु अशी परिस्थिती दिसत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi prakash ambedkar meets governor paramabir singh letter president rule sgy
First published on: 22-03-2021 at 13:00 IST