गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. २० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची भेट झाली. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती दिली. दरम्यान १४ एकरच्या जागेवर शक्य झाल्यास रिसर्च सेंटर उभं केलं पाहिजे अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती”.

Photos : प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत स्पष्टच म्हणाले, “स्वतः शरद पवार…”

“नाना पटोलेंनी काँग्रेस एकटं लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की आमच्याशी प्रत्येकजण वेगळं बोलणार आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

“२० तारखेचा पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी आधीच ठरला होता. प्रबोधनकार यांच्याशी संबंधित नवं पोर्टल आहे. प्रबोधनकार आणि बाबासाहेब यांचे संबंध जवळचे असल्याने त्यांनी या पोर्टलच्या उद्धाटनास येण्याची विनंती केली होती. त्यासाठी मी होकार दिला असून, हजर राहणार आहे. पण महाविकास आघाडीचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं पुढे काय होईल असं दिसत नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

“काँग्रेसचे काही नेते भेटून गेले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेशी राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांचे काही नेते भेटले हे खरं आहे. पण ही भेट फक्त २० तारखेच्या कार्यक्रमासंबंधी होती,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.