सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी आणि बदलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले.
कोणत्याही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा अप्रत्यक्ष फतवा सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्यास अडचणी येत असल्याचा आरोप दीपक साळुंखे-पाटील यांनी केला. तसेच बदलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेसुद्धा लोकप्रतिनिधींना दाद देत नाहीत, असेही ते म्हणाले. यावेळी उपसभापती वसंत डावखरे हे तालिका सभापती म्हणून काम बघत होते. त्यांनी साळुंखे यांचा प्रश्न ऐकताच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची त्वरित बदली करण्याचे निर्देश संबंधित मंत्र्यांना दिले.
 यावेळी काही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची आज संध्याकाळपर्यंतच बदली करा, अशी मागणी उचलून धरली. पण, सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईलच, असे आश्वासन दिल्यानंतर सदस्य शांत झाले. अशा हेकेखोर अधिकाऱ्यांमुळे लोकांची कामे करणे कठीण झाले, असल्याचे या सदस्यांचे म्हणणे होते.