परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्यासह कृषी विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी यांनी नेत्रदानाचा संकल्प केला असून त्यासाठीचे संमतीपत्र त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. विद्यापीठाचे मुख्यालय, उपकेंद्रे व महाविद्यालयांच्या माध्यमातून तब्बल एक हजार संमतीपत्रे देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये शुक्रवारी (दि.२) ‘नेत्रदान जनजागृती कार्यक्रम’ पार पडला. कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली, आरोग्य केंद्र व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. विजयसाई शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळे, डॉ. राहुल रामटेके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्यासह या मोहिमेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यापीठातील विविध विभागाचे अधिकारी तसेच विद्यार्थी अशा एकूण १४१ जणांनी नेत्रदानासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संमतीपत्र सुपूर्द केले असून, आणखी ३०० ते ३५० जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. उद्या सोमवारपर्यंत (दि.५) ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याशिवाय, या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने मुख्यालय व उपकेंद्रांसह एकूण १००० नेत्रदान संमतीपत्र मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. आसेवार यांनी नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत भारतात जवळपास दोन कोटी अंध लोक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अंधकार नेत्रदानातून दूर करण्यासाठी मोठी मोहीम उभारली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमात डॉ. विजयसाई शेळके यांनी नेत्रदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. नेत्रदान फक्त मृत्यूनंतरच करता येते आणि काही अपवाद वगळता कोणताही आजार असलेली व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र असते, असे त्यांनी स्पष्ट केले. बुबुळाच्या विविध कारणांमुळे होणाऱ्या अंधत्वावर नेत्रदानाद्वारे उपाय शक्य आहे. सध्या भारतात दोन कोटींहून अधिक अंध व्यक्ती असून दरवर्षी ३० ते ४० हजार जणांची यात नव्याने भर पडते, त्यामुळे नेत्रदानाची नितांत आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघा सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीपाद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी अशा एकूण चारशे जणांनी सहभाग नोंदवला.