सोनईतील सामूहिक अत्याचारातील पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या आईने जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची भेट घेत पोलीस तपासाबद्दल संशय व्यक्त करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. आरोपी विकास आल्हाट हा अल्पवयीन नसून त्याने दाखल केलेला वयाचा दाखला बनावट असल्याचीही तक्रार करण्यात आली.
मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची घटना आईने कथन केली. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व सुनीता साळुंके-ठाकरे तसेच सामाजिक कार्यकर्ते शरद काळे उपस्थित होते. गेल्या रविवारी सोनईच्या आठवडे बाजारातून पळवून नेऊन चौघांनी १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीचे आई-वडील तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते, मात्र सोनई पोलिसांनी सुरुवातीला फिर्याद नोंदवण्यासच टाळाटाळ केली. कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर गुन्हा दाखल केला.
इतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अटक केलेला आरोपी आल्हाट याची बाल सुधारगृहात रवानगी झाल्यावर लगेच जामिनावर सुटका करण्यात आली. त्याचा वयाचा दाखला बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. फिर्याद नोंदवतानाही एकाच आरोपीचे नाव द्यावे यासाठी दबाव टाकला जात होता. नंतर मुलीचा जबाब मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्ष शोभा पातारे यांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला.
मुलीस गेल्या चार दिवसांपासून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र डीएनए चाचणीचे किट केवळ मुंबईतच उपलब्ध होत असल्याचे कारण देत पोलीस विलंब करत आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victim girl neglect from police in gang rape
First published on: 09-08-2014 at 03:40 IST