|| सुहास बिऱ्हाडे

आगरी, ख्रिस्ती मते निर्णायक ठरणार; पूर, पाणीपुरवठा, २९ गावांची समस्या हे मुद्दे ऐरणीवर :- वसई विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आणि सुरक्षित मतदारसंघ. काँग्रेसनेही बविला पाठिंबा दिल्याने शिवसेना-भाजपाकडे बविआविरोधात लढत देणारा उमेदवारच नव्हता. त्यामुळे बविआ निर्धास्त होती. मात्र काँग्रेसच्या विजय पाटील यांनी सेनेत प्रवेश करून धक्का देत वसईतून ठाकुरांविरोधात लढत देण्यासाठी सज्ज झाले. पाटील यांच्या या नव्या खेळीमुळे बहुजन विकास आघाडीपुढे आव्हान निर्माण केले आहे.

वसई विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा मागील ३० वर्षांपासून बालेकिल्ला आहे. २००९च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने सर्वपक्षीय जनआनंदोलन समितीचे उमेदवार विवेक पंडित यांचा विजय झाला होता. मात्र नंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत ठाकूर पुन्हा निवडणुकीत उतरले आणि विजय मिळवला. ठाकूर यांचे साम्राज्य भेदायचे कसे, असा प्रश्न विरोधकांना होता.

वसई विधानसभा मतदारसंघात युतीच्या जागावाटपापूर्वी भाजपाने दावा सांगितला होता. अर्थात त्यात फारसा जोर नव्हता. हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला भेदायचा यावर शिवसेना आणि भाजपा याबाबत एकमत होतं. त्यामुळे त्यांनी वसईत ख्रिस्ती मतदारांचे प्राबल्य पाहता ख्रिस्ती उमेदवार देण्याबाबत चाचपणी केली होती. कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांचे नाव पुढे आले होते. मात्र अचानक राजकीय समीकरणे बदलली. काँग्रेसने ही जागा बविआसाठी सोडली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सचिव या जागेवर लढण्यासाठी इच्छुक असलेले विजय पाटील यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली. ते हेरून योग्य उमेदवाराच्या शोधात असणाऱ्या शिवसेना-भाजपने पाटील यांनाच शिवसेनेत घेऊन ठाकूरांविरोधात रिंगणात उतरविल्याने लढतीत चुरस निर्माण झाली.

विजय पाटील हे आगरी समाजाचे असून या मतदारसंघात आगरी समाजाची मोठी संख्या आहे. आहे. वसईत सक्रिय असलेल्या आगरी सेनेने आगरी आमदारचा नारा देत समाजाला आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसला मानणारा ख्रिस्ती मतदार वसईत मोठय़ा संख्येने आहे. पाटील जरी शिवसेनेत गेले असले तरी ख्रिस्ती मते त्यांच्या पारडय़ात पडतील, असा त्यांना विश्वास वाटतो. भाजपाने वसई मतदारसंघामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने मतदारांचे जाळे विणले आहे. त्यांचा पूर्वी मतदारसंघात दावा होता. मात्र विजय पाटील यांना सेनेतून उमेदवारी मिळाल्याने त्यांचा विरोध नाही आणि ते प्रचारात उतरले आहेत. त्याचा पाटील यांना फायदा होईल. तर वसईच्या ग्रामीण भागात असलेले शिवसेनेच्या ताकदीने पाटील यांना बळ मिळणार आहे.

मात्र वरकरणी या जमेच्या बाजू असल्या तरी पाटील यांना ठाकूरांचे साम्राज्य भेदण्याचे आव्हान सोपे नाही. गेल्या २०१४ निवडणुकीतील बलाबल पाहता हितेंद्र ठाकूर यांनी जनआंदोलनाच्या विवेक पंडित यांचा ३१ हजार मतांनी पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बविआने वसई मतदारसंघातून ९६ हजार मते मिळवून युतीच्या उमेदवारापेक्षा ११ हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे बविआला हा मतदारसंघ सुरक्षित वाटत आहे. शहरी भागात बविआ भक्कम आहे. नगरसेक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे आहे. विद्यमान महापौर, उपमहापौर या मतदारसंघातले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच सहकार संस्थांवर बविआचे वर्चस्व आहे. व्यापारी संघटना, बांधकाम व्यावसायिक संघटना ताब्यात आहेत. हे सर्व मोठय़ा संख्येने प्रचारात उतरले आहेत.

विजय पाटील यांना वैयक्तिक संपर्क, सेना-भाजप यांची वाढलेली शक्ती यांमुळे बविआ सावध झाली आहे. त्यांनीही जोरात प्रचार सुरू केला आहे. अनेक लहान-मोठे विरोधक, संघटनांचा पाठिंबा मिळवला आहे. ठाकूर यांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी पाटील सज्ज झाले असून त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

ल्ल वसईत उद्भवणारी पूरसमस्या ज्वलंत आहे. पावसात अनेक गावे पाण्यात जातात. तर शहरी भागातील दिवाणमान, माणिकपूर, डी. जी. नगर, विशाल नगर, पांचाल नगर सनसिटी आदी परिसर पाण्याखाली जातात. तेथील जनतेचा रोष आहे २९ गावांचा प्रश्न सुटलेला नाही. मागील १० वर्षांपासून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. भाजपने आश्वासन देऊनही निर्णय लागलेला नाही.

पूर्वपट्टीतील ६९ गावांना पाणीपुरवठाच होत नाही, तसेच पश्चिम पट्टय़ातील गावांपर्यंत महापालिकेचे पाणी पोहोचलेले नाही.

माझे कार्यकर्ते हीच माझी ताकद आणि केलेली कामे हीच शक्ती आहे. वसईचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहे. २९ गावांना आता पालिकाच हवी आहे. सुनियोजित शहर म्हणून वसई विकसित केले आहे. भविष्यात पूरसंकट येणार नाही, अशी कामे केलेली आहेत. – हितेंद्र ठाकूर, उमेदवार, बहुजन विकास आघाडी.

विकासाच्या नावाखाली शहर भकास करून टाकले आहे. अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अगदी नाल्यापासून रेल्वेपर्यंतच्या समस्या आहेत. नागरिकांना पूर्वी पर्याय नव्हता. त्यांना स्वच्छ प्रतिमा आणि कामे करणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत. – विजय पाटील, उमेदवार, शिवसेना