वकील गुणरत्न सदावर्ते सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर विजय वडेट्टीवार म्हणाले, “गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेंवर राज्य सरकारनं तात्काळ कारवाई करावी. राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उद्दातीकरण सुरू आहे.”
“सदावर्तेंसारखी संघाची पिलावळ महात्मा गांधी यांचा अपमान करत आहे. तरी त्याच्यावर कारवाई का होत नाही? स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापण्याची हिंमत यांची झालीच कशी? सत्ताधारी भाजपाचा हात असल्याशिवाय ही पिलावळ अशी गरळ ओकू शकत नाहीत आणि इतका माज करू शकत नाही,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा : यवतमाळात नेमके काय बोलले अॅड. गुणरत्न सदावर्ते…?
“आजच्या घडीला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक भाजपाच्या आशीर्वादाचे धनी असलेल्या सदावर्तेंसारख्या भ्रष्टाचाऱ्यामुळे अडचणीत आली आहे,” असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.