Vijay Wadettiwar On BMC Election Congress : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी करत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, या घडामोडी सुरू असतानाच आता महाविकास आघाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ”, असं विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसेच पक्षाच्या हायकमांडबरोबर चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि आमच्या लोकांनी देखील तेच ठरवलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
‘राज ठाकरे सोडा, उद्धव ठाकरेंबरोबरही निवडणूक लढणार नाही’, भाई जगतापांनी केलं होतं विधान
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही निवडणूक लढवणार नाही. मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाही मी ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती.”
“काँग्रेसची जी बैठक झाली त्यामध्ये आमच्या जवळपास सर्वच लोकांनी हेच सांगितलं. आमचे काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला हे देखील होते. आम्ही त्यांना सांगितलं ही एकतर या स्थानिक निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका नेत्यांच्या नाहीत. कार्यकर्त्यांच्याही इच्छा असतात की आपणही कधी ना कधी निवडणूक लढवल्या पाहिजेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, तर त्यांना या निवडणुका लढू दिल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला शिवसेनेबरोबरही गेलं नाही पाहिजे आणि राज ठाकरेंबरोबर जाण्याचा तर प्रश्नही नाही”, असं भाई जगताप यांनी म्हटलं होतं.
“आम्ही आमची मते मांडली आहेत. आतापर्यंत काँग्रेसने कधीही असं म्हटलेलं नाही की राज ठाकरे यांना बरोबर घेऊ आणि म्हणणारही नाही. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांचा एक पक्ष नाही तर सर्व मिळून आघाडी आहे. जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांची एकच शिवसेना होती, पण आता दोन-दोन शिवसेना झालेल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय म्हणतात? किंवा त्यांना काय ठरवायचं हा त्यांना अधिकार आहे. पण काँग्रेस तसा काही निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना या स्थानिक निवडणुकीत निर्णय घेऊ घेऊ दिला पाहिजे”, असं भाई जगताप यांनी म्हटलं होतं.
