महायुतीत सामील झाल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही बोललं जात आहे. शिंदे गटाला अधिक विकास निधी दिला जातो तर अजित पवार गटाला तुलनेनं कमी विकास निधी दिला जातो, अशी तक्रार अजित पवारांनी अमित शाहांकडे केल्याचं समजत आहे. निधी वाटपावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर टोलेबाजी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सगळ्यांना धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होतात. आता तशीच धमक अजित पवारांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्यांना रडवण्याची हिंमत आहे का? असा सवालही वडेट्टीवार यांनी अजित पवारांना विचारला आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “दादांचा चेहरा पाहिला तरी…”, अजित पवारांच्या नाराजीवर रोहित पवारांचं विधान

अजित पवारांच्या नाराजीबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, “अजित पवार कधी खूश असतात? ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले, तर ते खूश होतात. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. ‘हम करे सो कायदा’अशा पद्धतीने त्यांची भूमिका असते. आता तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं की, निधी मिळत नाही. अरे तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे, मग तुम्ही दुसऱ्यांकडे तक्रार का करता? आता तुमची धमक दाखवा.”

हेही वाचा- “तक्रार करताना अजित पवार रडले, असं…”, अमित शाहांबरोबरच्या भेटीबाबत काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाविकास आघाडी सरकारमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होतात. तीच धमक आता अजित पवारांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्यांना रडवण्याची हिंमत आहे का? हे अजित पवारांनी दाखवण्याची गरज आहे. आमचे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे अजित पवार दिल्लीचे चरणदास झाले आहेत. आता चरणदास आपली दादागिरी दाखवू शकत नाही,” असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.