कराड : माजी उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या सामाजिक कार्याच्या सुवर्ण महोत्सवाला सलाम म्हणून कराडकरांसाठी ‘लाडकी आई- ताई योजना’, ‘लाडके आजी- आजोबा योजना’ आणि ‘फिरता दवाखाना’ या तीन मोफत योजनांची घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जाहीर केल्या.
पावसकर पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार डॉ. अतुल भोसले, विनायक पावसकर, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, अजय पावसकर आदी या वेळी उपस्थित होते. विक्रम पावसकर म्हणाले, या योजनांची संकल्पना माझे बंधू अजय पावसकर यांची असून, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वानुसार या योजना राबविण्यात येतील. त्या एक ऑक्टोबरपासून सोमवार पेठेत प्रायोगिक स्वरूपात आणि पुढे टप्प्याटप्प्याने संपूर्ण कराड शहर परिसरासाठी राबवल्या जातील. लाडकी आई-ताई योजनेत १५ वर्षांवरील महिलांना ‘सिंदूर हेल्थ कार्ड’ देवून त्यातून त्यांना आरोग्य तपासणी, पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिवाळी साहित्याचा लाभ मिळणार आहे.
लाडके आजी-आजोबा योजनेतून ७० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘आण्णा पावसकर हेल्थ कार्ड’ दिले जाईल. त्यातून विनामूल्य संपूर्ण औषधे तसेच निराधार व ज्यांच्याकडे जेवण बनवण्याची अडचण असणाऱ्या ज्येष्ठांना सकाळ-संध्याकाळ ‘मायेचा जेवणाचा डबा’ पुरवला जाणार आहे. फिरता दवाखाना योजनेतून शहरातील प्रत्येक पेठेत त्या पेठेच्या नावाच्या वारांनुसार आरोग्यसेवा पुरवली जाईल. त्यासाठी यंदा पुरामुळे रद्द झालेल्या हिंदवी दहीहंडीचा निधी वळवण्यात आला असून, ज्येष्ठांच्या आरोग्याला प्राधान्य दिले असल्याचे विक्रम पावसकर यांनी सांगितले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, विनायक पावसकरांनी पन्नास वर्षे निष्कलंक, लोकाभिमुख कार्य साधले. समाजकारणाला दिलेले त्यांचे प्राधान्य त्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या या योजनांमधून प्रकर्षाने दिसून येते. कराडकरांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा. विनायक पावसकर म्हणाले, मी कधीही पद, पुरस्कारासाठी काम केले नाही. कराड शहर, त्यातील प्रत्येक नागरिकाच्या हिताला प्राधान्य दिले, चुकीच्या कामांना विरोधच केला. जनहित साधने हेच माझे ध्येय राहिले. संत गाडगे महाराज कचरामुक्त अभियान, हिंदू एकता आंदोलन किंवा श्रीकृष्ण गजानन मंडळातून सदैव समाजसेवा केली.