काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासह कराड दक्षिणमधील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष जगन्नाथराव मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली.
उंडाळकर निवडणुकीच्या रिंगणातच असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या निवडणूक प्रचारास उद्या शनिवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजता विंग (ता. कराड) येथून सुरुवात होत आहे. उंडाळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसशी दिलजमाई झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेस पक्षाचे सलग ७ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील -उंडाळकर यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीने तसा ठराव केला होता, आणि असे असताना, आमदार उंडाळकरांची उमेदवारी डावलून कराड दक्षिणेतील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्यायच केला गेला आहे. तरी, आम्ही सर्व कराड दक्षिण काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व क्रियाशील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे निवेदन जगन्नाथराव मोहिते यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठवले आहे. या निवेदनावर काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष जगन्नाथराव मोहिते, उपाध्यक्ष मन्सूर फकीर, रंगराव थोरात व सचिव डॉ. राजेंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची ही प्रत जिल्हा काँग्रेस कमिटीलाही पाठवण्यात आल्याचे निवेदनाखाली नमूद करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उंडाळकर अर्ज भरणार
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासह कराड दक्षिणमधील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष जगन्नाथराव मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली.
First published on: 27-09-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilas kaka undalkar against cm prithviraj chavan in south karad