मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपळूण-पिरोळे (चिपी) विमानतळावरून ९ ऑक्टोबर रोजी नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती राणे यांनी दिली होती. राणे व शिंदे दिल्लीहून मुंबईला जातील व तिथून ते चिपी विमानतळावर पोहोचतील असे सांगण्यात आलं आहे. मात्र, या विमानतळावरून ७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होईल, असे ट्वीट शिवसेनेचे सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ सुरु होण्याबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळ त्यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असलेला चिपी विमानतळाबाबत माहिती देण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळ सुरु करण्यासाठी दोन वर्षात चार महत्त्वाच्या बैठका घेतल्या. चार हवाई वाहतुक मंत्र्याना पाठपुरावा करुन विमानतळाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. या सर्व प्रयत्नातून चिपी विमानतळावरून हवाई वाहतूक नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चेतून ९ ऑक्टोबर रोजी विमानतळ सुरु होणार आहे,” असे विनायक राऊत यांनी म्हटले.

“सिंधुदुर्ग विमानतळ हे महाराष्ट्राचे आहे. केंद्र सरकार हे केवळ परवाना देण्याचे काम करत आहे. आता जे हुशारकी करत आहेत त्यांना एक लक्षात असलं पाहिजे की, मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या. अगदीच माहिती नसेल तर अमित शाहांकडून शिकून घ्या. परंतु काल तेही बडेजाव मारायला लागले की, बाप असावा तर असा. बाप असला पाहिजे पण आयत्या बिळातला नागोबा असता कामा नये. नारायण राणेंना या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही,” असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी विमानसेवा सुरू करण्याचे अधिकार केंद्राकडे असताना राज्य सरकार वा शिवसेना ही सेवा कशी सुरू करू शकते, असा सवाल राणे यांनी केला होता. केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यावर, सीबीआय सज्जन व्यक्तींना त्रास देत नाही असा टोला राणेंनी लगावला.