वाइन महोत्सवाच्या उद्घाटनात छगन भुजबळ यांची घोषणा
वाइन हे आरोग्यदायी पेय आहे. परंतु, त्याकडे मद्य म्हणून पाहिले जाते. वाइनबाबत जनजागृती करण्यासाठी महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी विंचूरच्या वाईन पार्कमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ‘वाइन रिसॉर्ट’ उभारले जाईल, अशी घोषणा नाशिकचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केली. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वाइनला देशासह जागतिक पटलावर नेण्याच्या उद्देशाने भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ आणि वाइन उत्पादक संघटना यांच्यावतीने आयोजित ‘वाइन व फूड’ महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी भुजबळ व अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे अध्यक्ष जगदिश होळकर, वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आहेर आदी उपस्थित होते. वाइनचे आकर्षण वाढले असले तरी वाइनबद्दल समाजात पुरेशी जागृती झालेली नाही. त्यामुळे या आरोग्यदायी पेयाकडे मद्य म्हणून पाहिले जाते. वाइनचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. जिल्ह्यातील वाइन पार्कची ओळख राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून याच ठिकाणी ‘वाइन रिसॉर्ट’ उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. महोत्सवातून नागरिकांची वाइनविषयी जिज्ञासा शमणार आहे. नाशिकच्या पर्यटनाच्यादृष्टीने ही एक चांगली संधी असल्याचे गुणाजी यांनी सांगितले. जगदिश होळकर यांनी महोत्सवाचा उद्देश वाइन उद्योग देशातील नागरिकांना समजावून देण्याचा असल्याचे सांगितले. ‘वाइन व्हॅली ऑफ इंडिया’ असे बिरुद मिळविणाऱ्या नाशिकमध्ये होणारा हा महोत्सव कायमस्वरुपी आयोजित करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला.
तीन दिवसीय वाइन महोत्सवात तज्ज्ञांसोबत चर्चा, २०० हून अधिक कंपन्यांची वाइन, सर्व प्रकारची द्राक्षे, बेदाणा उपलब्ध आहे. या शिवाय, योगा व साधना, बँड, पतंगबाजी, चेहेऱ्यावरील चित्रकला, पैठणी कक्ष, पारंपरिक संगीत व नृत्य, तंबूत राहण्याची व्यवस्था, वाइन कार्यशाळा व चर्चासत्र, विनयार्डची सफर, बैलगाडी फेरी तसेच हेलिकॉप्टरमधून हवाई सफारी अशी भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2014 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये ‘वाइन रिसॉर्ट’ उभारणार
वाइन हे आरोग्यदायी पेय आहे. परंतु, त्याकडे मद्य म्हणून पाहिले जाते. वाइनबाबत जनजागृती करण्यासाठी महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे.
First published on: 15-02-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vine resort in nasik