सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ात शासनाच्या सर्व विभागात रिक्त पदांमुळे शासकीय योजना राबविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाकडे विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्य़ातील सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बठकीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय िशदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांसह सर्व विभागांचे विभागप्रमुख यावेळी या बठकीला उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ात पदे रिक्त असल्यामुळे शासनाच्या योजना राबविताना येणारी अडचण लक्षात घेता विदर्भाच्या धर्तीवर या दोन जिल्ह्य़ातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागात मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती जिल्हााधिकारी यांच्यामार्फत सादर करावी. तसेच जिल्ह्य़ात ज्या विभागांचे शासनाकडे मंत्रालय स्तरावर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत व आतापर्यंत ते मंजूर झाले नाहीत, असे प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाने अशा प्रलंबित प्रस्तावांची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्याचे आदेश तावडे यांनी दिले.
तावडे म्हणाले, जिल्ह्य़ातील प्रत्येक विभागाच्या मंत्रालय स्तरावर प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री यांच्या मार्फतही विशेष प्रयत्न करण्यात येतात. परंतु एखाद्या विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरही त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत. आरोग्य विभागाने साथींच्या कालावधीत अतिरिक्त डॉक्टरांची सेवेची मागणी करावी जेणेकरून जिल्ह्य़ातील जनतेचे आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. स्वाईन फ्ल्यू अथवा लेप्टो, स्पायरोसिस या आजारांचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करावे तसेच प्रभावीपणे यंत्रणा राबविण्याचे आदेशही यावेळी दिले. तसेच नुकसानभरपाई रकमेचे वाटप शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहीत कालावधीत करण्यात यावे. वन विभागाने वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना देण्यात येणारे नुकसानभरपाईचे प्रस्ताव वस्तुस्थितीला धरून सादर करावेत, अशा सूचना यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde assurance about vacant posts in government department of sindhudurg and ratnagiri district
First published on: 21-09-2015 at 04:07 IST