दुष्काळग्रस्तांची दु:खं समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सुरू केलेली ‘संवाद पदयात्रा’ ४५० किलोमीटरचा टप्पा पार करत शुक्रवारी पंढरपुरात पोहोचली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्यातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्य़ातील भिवघाट येथे येत्या मंगळवारी (५ मार्च) या पदयात्रेची सांगता होणार आहे.राज्याच्या दुष्काळी भागातील लोकांशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे, केंद्र व राज्याकडून मिळणारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे का, याची माहिती घेण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम व त्यांचे सहकारी ११ फेब्रुवारीपासून दुष्काळी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या ५२० किलोमीटर अंतराच्या पदयात्रेला बुलढाण्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर जालना, औरंगाबाद, नगर, बीड, उस्मानाबाद,सोलापूर या जिल्ह्य़ांचा दौरा करत ही यात्रा शुक्रवारी पंढरपुरात पोहोचली.या यात्रेत सुमारे नऊशे कार्यकर्ते सहभागी आहेत. या पदयात्रेत जलसंधारणाबाबत प्रबोधन करण्यात येत आहे आणि लोकांच्या अडचणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत, असे कदम यांनी सांगितले. या काळात दुष्काळग्रस्तांच्या भावना व प्रश्न नेमकेपणाने समजल्याचे कदम यांनी सांगितले. चारा छावण्यांमधील अडचणी, जलसंधारणात काही गावांनी केलेली चांगली कामे, टँकर भरण्यासाठी वापरले जाणारे जलसाठेच कोरडे पडणे, गावांमधून तरुणांचे स्थलांतर होणे अशा अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहता आल्या. आपले पाणी दुसऱ्या गावाने पळविल्याची भावना बहुतांश गावांमध्ये आहे. ही धोक्याची बाब असून, त्याकडे लक्ष दिले गेले नाही तर पुढच्या काळात अनेक प्रश्न निर्माण होतील अशी भीतीही या दौऱ्यात पाहायला मिळाली, असेही त्यांनी सांगितले.