सांगली : विश्वास कारखाना १० टनाचा बायोगॅस प्रकल्प आणि दीड मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात कारखान्याची ५५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर व राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते.

अध्यक्ष नाईक म्हणाले, उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी विश्वास समृद्ध शेतकरी अभियान व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याकडून ६ हजार ७५० अनुदान देणार आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना एक रुपयात उसाचे रोप देण्याचेही उपक्रम राबविण्यात येत आहे. कारखाना लवकरच १० टनाचा बायोगॅस प्रकल्प आणि दीड मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.

कारखान्याने उभारलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पाचा वीज कंपनीशी केलेला करार येत्या २४ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन धोरणानुसार २ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट दर कमी मिळणार आहे. हा होणारा तोटा भरून काढण्यासाठी कारखाना दीड मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प तसेच १० मेट्रिक टन प्रतिदिनी क्षमतेचा कॉप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प (सी.बी.जी.) उभारणार आहे. कारखान्याने पूर्वी उभारलेल्या इथेनॉल प्रकल्पातून एक लिटरचे उत्पादन घेऊ शकलो नाही. याला केंद्र शासन जबाबदार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी या उत्पादनावर बंदी आणली. केंद्र शासनाने उसाचे दर वाढवत नेले आहेत. मात्र साखरेचे विक्री दर कित्येक वर्षापासून एकच ठिकाणी स्थिरावले आहेत. साखरेचे दर प्रतिटन ४ हजार ४०० पर्यंत वाढ व्हायला हवेत. उद्योगपतींच्या दबावामुळे मात्र केंद्र शासन त्यात वाढ करत नाही. त्याप्रमाणे साखर निर्यातीचे व इथेनॉलचे धोरणही किमान १० वर्षीसाठी निश्चित करायला हवे.

संचालक विराज नाईक यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. या सभेसाठी कारखान्याचे संचालक, सभासद उपस्थित होते.