नगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ११ तास तर शिर्डीची मतमोजणी १२ तास चालली. सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या नगरच्या मतमोजणीनंतर सायंकाळी ७ वाजता भाजपचे दिलीप गांधी यांना तर शिर्डीतुन रात्री ८ वाजता शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. मतमोजणीच्या ठिकाणी ऑनलाईन संगणक व्यवस्था उभारली होती तरी यंत्रणेतील अधिकारी निकाल जाहीर करताना अचूकतेसाठी संगणकाऐवजी मनुष्यबळाने केलेल्या आकडेवारीवरच अधिक विसंबून रहात होती, हे विशेष.
दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसीतील सरकारी गोदामात अनुक्रमे जिल्हाधिकारी अनिल कवडे व अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अधिपत्याखाली झाली. दोन्ही ठिकाणी निवडणुक निरीक्षक उपस्थित होते. मोजणी ठिकाणच्या बंदोबस्तासाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली होती.धातू शोधक यंत्र व व्हिडिओ कॅमेरे बसवले गेले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदेही पूर्ण वेळ उपस्थित होते.
सकाळी ८ वाजता प्रथम पोस्टल मतांची गणना झाली नंतर साडेआठच्या सुमारास मतदान यंत्रातील मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरु करण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोजणीसाठी १४ टेबल्स होते. पहिल्या फेरीचा निकाल, शिर्डीचा सकाळी ९.४५ लाक जाहीर करण्यात आला. तर नगरची पहिली फेरी सकाळी १० वाजता जाहीर झाली. त्यानंतर तीन फेरीपर्यंत शिर्डीची मोजणी यंत्रणा आघाडीवर होती, ती नंतर मागे पडली व नगरच्या यंत्रणेने आगेकूच सुरु केली ती निकाल जाहीर करेपर्यंत कायम होती. सुरुवातीच्या तीन-चार फेऱ्या वगळता नंतर प्रत्येक फेरी दर अध्र्या तासाने जाहीर केली जात होती. अखेरच्या टप्प्यात मात्र मोजणीचे काम व निकाल जाहीर करण्याचे काम काहीसे रेंगाळले.
राजळे आलेच नाहीत
मोजणी ठिकाणी सकाळपासून काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. थोडय़ा वेळाने सेनेच्या सदाशिव लोखंडे यांचे आगमन झाले. दोघांनी काही काळ शेजारी बसून गप्पाही मारल्या. फेऱ्यांचा कल लक्षात घेऊन अकराच्या सुमारास वाकचौरे निघून गेले. नगरचे दिलीप गांधी यांचे मोजणीच्या ठिकाणी दुपारी २ वाजता आगमन झाले. राष्ट्रवादीचे राजीव राजळे तर मोजणी ठिकाणी फिरकलेही नाहीत. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित नव्हते. दुपारी ३ नंतर आ. अशोक काळे, आ. शिवाजी कर्डिले, आ. राम शिंदे, आ. विजय औटी तेथे आले.
गांधींची मते दुप्पट
गेल्या निवडणुकीवेळी दिलीप गांधी यांचे राजळे यांच्यापेक्षा मताधिक्य ४२ हजाराचे होते, त्यात यंदा पाचपटीहून अधिक तर मतांमध्ये तब्बल दुप्पट वाढ झाली. गेल्यावेळी रामदास आठवले यांचा पराभव करणारे नवखे भाऊसाहेब वाकचौरे ‘जायंट किलर’ ठरले होते. परंतु यंदा २ लाखावर मतांनी पराभव स्वीकारणाारे वाकचौरे एका अर्थाने ‘जायंट लूजर’ ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vote counting 11 hours in nagar 12 hours in shirdi
First published on: 17-05-2014 at 03:47 IST