हिंगोली लोकसभा मतदारसंघात १७ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्य़ात १५ लाख ६४ हजार ६६७ मतदारसंख्या आहे. जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. दरम्यान, मतदारयादीत नाव नसणाऱ्यांना ९ मार्चपर्यंत यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे.
निवडणूक आचारसंहिताची काटेकोर अंमलबजावणी करण्यास प्रशासनाची करडी नजर असेल. ‘पेड न्यूज’कडेही लक्ष राहणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली, कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट, उमरखेड या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पुरुष मतदार ८ लाख २९ हजार ५४७, तर स्त्री मतदार ७ लाख ३५ हजार १२० आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, रवींद्र परळीकर या वेळी उपस्थित होते.