कापील, गोळेश्वरमध्ये बोगस मतदानाचा दावा फेटाळला
कराड : विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील कापील येथे मतदान केलेल्या ‘त्या’ ९ मतदारांची तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी झाली असून, ते त्या ठिकाणी राहत नसल्याचा पंचनामा आहे. यावर सुनावणी घेऊन त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली. कापील व गोळेश्वरमध्ये बोगस मतदान झाल्याचा माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांचा दावा म्हेत्रे यांनी फेटाळला आहे. तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.
कापीलमध्ये बोगस मतदान झाल्याचे पुरावेही गणेश पवारांनी पत्रकारांना दिले आहेत. त्यात एका महिला मतदाराने कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार कार्डाच्या पुराव्यावर कापीलला मतदान केले. काही मतदारांची नावे कापील व गोळेश्वर अशा दोन्ही ठिकाणच्या मतदारयादीमध्ये आढळली आहेत. शिवाय गोळेश्वरमध्ये ७५ बोगस मतदारांची नावे आढळल्याचा गणेश पवारांचा दावा आहे.
त्यावर प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, की मतदार नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन असते. संबंधित व्यक्तींनी मतदारनोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली, याची माहिती तक्रारींच्या अनुषंगाने घेतली जाईल. ज्यांनी तक्रार केली, त्यांना या प्रकरणात फौजदारी कारवाई व्हावे असे वाटत असल्यास त्यांनी पुराव्यासह पोलिसांत तक्रार द्यावी.
दरम्यान, कापीलमध्ये झालेले मतदान बोगस आहे का, गोळेश्वरमध्ये आधारवर पत्ता नसणारे, दुसऱ्याच्या नावाचे वीज देयक पुरावा म्हणून दिलेल्यांची मतदार नोंदणी कशी झाली, कापील व गोळेश्वर दोन्ही गावांच्या मतदारयादीमध्ये एकाच व्यक्तीचे नाव कसे, कोल्हापूरच्या आधार कार्डाच्या पत्त्यावर येथे मतदारनोंदणी कशी, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या तरतुदींआधारे उत्तरे दिली. कापील, गोळेश्वरमधील ज्या मतदारांच्या तक्रारीची चौकशी करून गुन्हे दाखल करणार का, यावर त्यांनी त्यासाठी वेगळे प्राधिकरण असल्याचे सांगितले.
कापील व गोळेश्वर येथील त्या मतदारांविरोधात काय कारवाई होणार, मतनोंदणी करताना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) चुका झाल्या का, मतदारयादी सदोष आहे का, या प्रश्नांवर प्रांताधिकाऱ्यांनी कोठेही चूक नसल्याचे ठामपणे सांगितले. तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी होऊन सुनावणीसाठी तक्रारदार व संबंधितांना बोलावून कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.