सोळाव्या लोकसभेसाठी सांगली मतदारसंघात उद्या (गुरुवारी) मतदान होत असून १७२५ मतदान केंद्रांसाठी ९७८५ कर्मचारी बुधवारी रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील ६ मतदान केंद्रांवर होणारी मतदान प्रक्रिया थेट निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पाहण्याची सुविधा पहिल्यांदाच करण्यात आली असून या पकी ५ केंद्रे सांगली संघातील आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात पार पडावी यासाठी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला असून गोवा राज्याचे पोलीसही बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत.
सांगली मतदारसंघामध्ये मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत हे ६ विधानसभा मतदारसंघ सामील असून एकूण मतदार संख्या १६ लाख ४७ हजार ७३५ असल्याची माहिती निवडणूक माहिती अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. जिल्ह्य़ात प्रथमच तृतीय पंथीयांची स्वतंत्र नोंद मतदार यादीत करण्यात आली असून सांगली मध्ये १३ आणि मिरज विधानसभा मतदार संघात ८ तर अन्यत्र ११ असे ३२ तृतीय पंथीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संघात १७२५ मतदान केंद्रे असून सर्वाधिक केंद्राची संख्या ३३६ खानापूर मतदारसंघात आहे. ३०० पेक्षा कमी मतदार संख्या असणारी १० मतदान केंद्रे असून ही केंद्रे पलूस व खानापूर मतदारसंघात आहेत, तर १५०० हून अधिक मतदार संख्या असणारी ३ केंद्रे सांगली व मिरजेत आहेत.  खानापूर मतदारसंघातील कसबवडे या ठिकाणी अवघ्या १७१ मतदारांसाठी मतदान कक्ष उभारण्यात आला आहे.
बुधवारी सकाळपासून संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या तहसील कार्यालयाचे मतदान कर्मचारी ज्या, त्या केंद्रावर पोहोच करण्यासाठी २७० एस.टी. बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदान केंद्रावर अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका प्रत्येक केंद्रावर उपलब्ध करून दिल्या असून सांगली मतदारसंघातील बुधगाव, सांगलीतील वडर कॉलनी, मिरजेतील शाळा नं २१ व २३ आणि तासगाव तालुक्यातील चिंचणी या ठिकाणी असणा-या मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या शिवाय हातकणंगले मतदारसंघातील इस्लामपूरच्या शाळा नं. १ च्या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियाही आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात २४२ आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंद करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले. राज्याच्या सिमेवर म्हैसाळ, शिंदेवाडी, लोणारवाडी, सलगरे, बसर्गी, मुच्चंडी, कोणतेव बोबलाद व तिकोंडी अशा ८ ठिकाणी तर जिल्हा सिमेवर नागज, अंकली, माहुली, कडेगाव, दिघंची, कोकरूड-कराड रस्त्यावर अशा ६ ठिकाणी चेकपोस्ट ठेवण्यात आले आहेत. मतदानाच्या कालावधीत या ठिकाणी बहुसंख्य खासगी वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
गुरुवारी मतदानाच्या वेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला असून १४४२ पोलीस कर्मचारी आणि ८८० गृहरक्षक दलाचे जवान प्रत्यक्ष मतदान केंद्रासाठी तनात आहेत. या शिवाय ९३ अधिकारी व ३७२ पोलीस कर्मचा-यांची वेगवेगळी भरारी पथके मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत राहणार आहेत. तसेच गोवा पोलिसांची दोन पथके राखीव म्हणून तनात करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक श्री. सावंत यांनी दिले. आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे सव्वा कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी पकडली असून त्याची शहानिशा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.