प्रशांत देशमुख

टाळेबंदीच्या दुसऱ्याच दिवशीपासून विविध आघाडीवर मदतीचे व प्रशासनाला सर्व ते सहकार्य करणाऱ्या वैद्यकीय जनजागृती मंचने जिल्ह्यातील लहानमोठ्या पाचशेवर पत्रकारांना पूर्व खबरदारी म्हणून आजपासून औषधींचे वाटप सुरू केले आहे.

डॉ. सचिन पावडे यांच्या नेतृत्वातील ही स्वयंसेवी संघटना प्रशासनासाठी ‘करोना वॉरियर्स’ ठरली आहे. टाळेबंदीनंतरच्या काही दिवसात प्रामुख्याने स्थलांतरीत मजूरांच्या आश्रयाचा प्रश्न उद्भवताच वैद्यकीय मंचने फुडपॅकेट पुरवत प्रारंभिक दिलासा दिला होता. त्यानंतर एक निवारागृह जवळपास दीड महिने सांभाळले. आश्रयातील मजूरांना मंचच्या डॉक्टर पदाधिकाऱ्यांनी जेवण नाश्त्यासोबतच विरंगुळ्याचे कार्यक्रमही दिले. स्वत:च डॉक्टर असल्याने संघटनेची टीम विविध निवारागृहातील कामगार मजूरांच्या आरोग्याचीही काळजी घेत होतीच. हे करतांना प्रशासनाने आखलेल्या उपायांना मंचचा आधार मिळाला. आदर्श भाजीबाजार, बाजाराचे नियमन, ग्राहकांना सूचना, मदतीचा दुरूपयोग टाळणे, अधिकाऱ्यांना वैद्यकीय सेवा व तत्सम मदतीचे हात मंचच्याच डॉक्टरांचे होते.

प्रामुख्याने जलसंवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैद्यकीय मंचने करोनाचे आव्हान सेवेची संधी मानले. या युध्दात अग्रेसर असलेल्या पत्रकारांनाही सावधगिरी म्हणून होमिओपॅथीच्या ‘अर्सेनिक अल्बम ३०’ गोळ्या तसेच व्हिटॅमिनच्या गोळ्या आजपासून दिल्या जात आहे. डॉ. सचिन पावडे याविषयी बोलतांना म्हणाले की, घरापेक्षा या काळात घराबाहेर अधिकवेळ देणाऱ्या सर्वानीच स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतर योध्यांना आवश्यक ती औषधी पुरविण्यात आली आहे. पत्रकारांसाठी अशीच काळजी घेणे आवश्यक वाटल्याने पूरक औषधी देण्याचा संघटनेचा मानस आहे. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणे आता आवश्यक ठरले असल्याचे डॉ. पावडे म्हणाले.

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अत्यल्प असल्याने तो वाढू नये म्हणून यासाठी पुढील उपायांना मदत करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.