प्रशांत देशमुख

महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या माजी नगराध्यक्षा व खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांनी स्वत: शिवलेल्या मास्कचे आज मोफत वाटप करीत चहा नाश्त्यानंतर मदतीचे दुसरे पाऊल टाकले.

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर विविध कामं पुढे आली आहेत. स्वयंसेवी संस्था व व्यक्तीही प्रशासनाला त्यात सहकार्य करीत आहे. हे पाहून शोभा तडस यांनी महामार्गावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना महिला सहकाऱ्यांसह तयार केलेला नाश्ता खाऊ घातला होता. सोबतच रात्रकालीन सेवेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्थाही केली होती. आता मास्कचा तुटवडा व उपलब्ध मास्क महागड्या किंमतीत विकले जात असल्याचे पाहून शिवणकामात तरबेज असलेल्या शोभाताईंनी घरचेच शिवणयंत्र बाहेर काढले. सोबतच आपल्या महिला सहकाऱ्यांनाही मदतीला घेतले.

दररोज दोनशे मास्क शिवून तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसात देवळी व ग्रामीण परिसरातील आरोग्य केंद्रावर या मास्कचे वाटप करण्यात आले. आज वर्धा शहरातील रोटरीतर्फे लावण्यात आलेल्या सुरक्षित भाजी बाजारातील विक्रेत्यांनाही त्यांनी मास्कचे वाटप केले. मास्क काढू नका, करोनाला निमंत्रण देवू नका, असा सल्लाही द्यायला त्या विसरल्या नाही. पाच हजार मास्क शिवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.