दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बियाणांच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आज दुपारी अचानक वर्धा शहरातील कृषी केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुकानांतील बियाणांचा साठाही तपासला, यामुळे व्यावसायिकही चकीत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तपासणी दौऱ्यात कृषी केंद्र व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. याशिवाय यंदा बियाण्यांची पुरेशी उपलब्धता होईल काय याबाबत चर्चेद्वारे माहिती जाणून घेतली. याप्रसंगी कृषी विभागाचे मंडळ अधिकारी व अन्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी थेट कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतक-यांसह कृषी केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याची संवाद साधला. शिवाय ‘विदर्भ अ‍ॅग्रो या कृषी केंद्रा’सह सुमारे आठ कृषी केंद्रांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कृषी केंद्रांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? खत व बियाणे यांचा तुटवडा आहे का? तसेच यंदा शेतकऱ्यांकडून कुठल्या बियाण्यांना जास्त मागणी आहे, या विषयाची माहिती जाणून घेतली.

शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सध्या शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांमध्ये येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कृषी केंद्र जास्त वेळ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी कृषी केंद्र व्यावसायिकांनी जिल्हाधिका-यांकडे केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha farmers rush to buy seeds the collector suddenly inspected the agricultural centers aau
First published on: 13-06-2020 at 15:35 IST