वर्धा मधील हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथे नदीत पोहायला गेलेल्या चार तरूणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) सायंकाळी उघडकीस आली. हृतिक नरेश पोखळे (वय २१) आणि संघर्ष चंदुजी लढे (वय १८ ) दोघेही राहणार पिंपरी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर रणजीत रामजी धाबर्डे (वय-२८) आणि शुभम सुधारकर लढे (वय-२६) हे दोघे जीव वाचवत पाण्यातून बाहेर आले. पोलीस व स्थानिक नागरिकांकडून बुडालेल्या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
आज दुपारच्या सुमारास दुचाकीने आजनसरा येथुन पिंपरी येथील हृतिक पोकळे, संघर्ष लढे, रणजीत धाबर्डे आणि शुभम लढे हे हिवरा येथील वर्धा आजनसरा नदीत पोहायला गेले होते. मात्र या चौद्यांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी दोन जण नदीत बुडाले, तर अन्य दोन जण सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी आणि वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बागडे, पोलीस कर्मचारी बीट जमादार प्रशांत वैद्य, आशिष डफ, अमोल खाडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने हृतिक पोखळे आणि संघर्ष लढे यांचे मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.