कोबी आणि टोमॅटोला भाव मिळत नसल्याने जालना तालुक्यातील पाहेगाव येथे एका शेतकऱ्याने फावड्याने शेती उद्ध्वस्त केल्याची घटना घडली. फावड्याने शेती उद्ध्वस्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बळीराजाची व्यथा या व्हिडिओतून समोर आली आहे.

जालना तालुक्यातील पाहेगावात राहणारे प्रेमसिंग लाखील चव्हाण हे कोबी आणि टोमॅटोची शेती करतात. फळभाज्यांचे भाव पडल्याचा फटका प्रेमसिंग यांना देखील बसला. भाव मिळत नसल्याने प्रेमसिंग निराश झाले होते. वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने प्रेमसिंग यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी फावड्याने कोबी आणि टोमॅटोची शेतीच उद्ध्वस्त केली. प्रेमसिंग शेती उद्ध्वस्त करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, पिकाला कवडीमोल भाव मिळतो. माझी व्यथा सांगून उपयोग नाही. आम्हाला कोणीच मदत करु शकत नाही. सरकार काहीच करु शकत नाही. ते फक्त मन की बात करतात. सरकार मदत करु शकत नाही. टोमॅटो सडत आहे. असे टोमॅटो कोण घेणार?, याला भाव मिळत नाही. मला काहीच कळत नाही. मी काय करु असा सवाल ते विचारताना दिसतात.  पाहेगावातील हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.