टेंभू योजनेचे पाणी २० मे पर्यंत खानापूर तालुक्यातील भाग्यनगर तलावात सोडण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार बठकीत सांगितले.  विकास कामांना गती देण्यासाठी सर्व विभागाच्या साप्ताहिक बठका घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने निवडणुका झालेल्या राज्यात असणारी आचारसंहिता सशर्त शिथिल केली असून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विभाग वगळता अन्य विभागातील आढावा पालकमंत्री डॉ. कदम यांनी सोमवारी घेतला.  सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे कृषी व जिल्हापरिषद या विभागातील अधिकाऱ्यांची बठक शासकीय विश्रामधामवर आज झाली.
आढावा बठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  टेंभू योजनेसाठी ११२ कोटी रूपये आणि ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ९० कोटी रूपये उपलब्ध झाले असून ही कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.  टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात पोहचले असून खानापूर तालुक्यात २० मे रोजी पाणी पोहोचणार आहे.  या दिवशी भाग्यनगर तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडले जाणार आहे.  पाणी योजनेअंतर्गत असणाऱ्या गावातील तलाव भरून घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १८२ गावातील शेतकऱ्यांना गारपिटीचा तडाखा बसला.  गारपीटग्रस्त २३३८२ लोकांना १६ कोटी ४२ लाख ५७८ रूपयांची मदत देण्यात आली आहे.  ही मदत बँकेमार्फत वितरीत करण्यात आले असून अवघे २६ लाभार्थी बँकेचे खाते नसल्याने मदतीपासून वंचित राहिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तमाशासम्राट काळू-बाळू या जोडगोळीने सांगलीचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर सांस्कृतिक क्षेत्रात गाजविले.  त्यांच्या स्मरणार्थ कवलापूर येथे स्मारक उभारण्यास तत्त्वत मान्यता असल्याचे डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.  स्मारकासाठी कवलापूर येथे ६० हजार चौरस फुटाचा भूखंडही निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water of tembhu scheme in khanapur
First published on: 29-04-2014 at 02:15 IST