सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातील हिप्परगा येथील तलाव बुधवारी पूर्णपणे भरून वाहू लागला. दरम्यान हे पाणी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने तसेच दुसऱ्या बाजूला पुणे चौत्रा नाका परिसरात नागरी वसाहतींमध्ये पाणी घुसल्यामुळे तेथे हजारो वस्तीधारकांना पाण्याचा विळखा पडला आहे. त्यामुळे तेथील परिसरात महापालिका आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन प्रणाली धावून आली आहे.

हिप्परगा ब्रिटिशकालीन येथील तलाव शहराच्या पाणीपुरवठासाठी बांधण्यात आला होता. हा तलाव सुमारे अडीच टीएमसी क्षमतेचा आहे. तेथून जवळच सोलापूर- तुळजापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. विशेषतः हिप्परगा तलाव सोलापूर आणि तुळजापूर येथून गेल्यामुळे तेथून तलावात पूर्ण भरून वाहणारे पाणी दोन्ही रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूकडील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चार पदरी रस्त्यावर दोन्ही बाजूला पाणी भरून असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्याच बरोबर आसपासच्या शेतीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर घुसल्याने पिकांची मोठी नासाडी होत आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

हिप्परगा तलाव शंभर टक्के भरल्यामुळे तलावाचे दोन्ही सांडव्यातून पाणी सोडलेले पाणी दुसऱ्या बाजूला ओढे, आदिला नदीमध्ये सोडण्यात येत आहे. हे नाले व आदिला नदीला भरपूर प्रमाणात पाणी येऊन ते पुढे जवळच्या नागरी वसाहतींना विळखा पडू लागला आहे. ओढा नागरी वसाहतींकडे जाणाऱ्या दिशेने जातो, तेथे खूपच अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे वसंत विहारसारख्या भागात हजारो घरांना पाण्याचा विळखा पडला आहे.

यातच महापालिका आपत्ती व्यवस्था प्रतिसाद प्रणाली जागे होऊन कामाला लागली. दुपारपर्यंत तेथील ओढ्यातील आणि वसाहतींमध्ये पाणी साचलेल्या भागात झाडी, केरकचरा जेसीबीच्या साह्याने बाजूला काढण्याचे काम सुरू होते. फायर ब्रिगेडची यंत्रणा जागेवर होती. नागरिकांनी पाण्याचा अंदाज घेऊन पुढे न जाण्याची जोखीम पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या भागातील आमदार विजय देशमुख यांनी या भागात जाऊन आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद प्रणालीला आणखी कामाला लावले.