अमरावती जिल्ह्य़ात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागले असून वरूड, अचलपूर, अंजनगावसुर्जी, चिखलदरा, धारणी, तिवसा या तालुक्यांसह जिल्ह्य़ातील विविध भागात गैरनियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
अमरावती शहरात मुबलक पाणी मिळत असल्याचे गेल्या काही वर्षांतील चित्र आहे, पण शहराच्या विस्तारासोबत जलवाहिन्यांचे जाळे विकसित होऊ न शकल्याने उपनगर भागांमध्ये पाण्यासाठी रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बडनेरा जुनी वस्ती भागातील पाण्याची टाकी क्षतीग्रस्त झाल्याने ती पाडण्यात येत आहे. नवीन टाकी उभारण्याला वेळ लागणार आहे. सध्या नवी वस्तीतील टाकीतूनच काही भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. उपनगराला एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. शहरातील चार झोनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सलग २४ तास पाणीपुरवठा केला जात होता, पण बडनेरा उपनगरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने आणि शहराच्या इतर भागात पाण्याची मागणी वाढल्याने २४ तासांचा पाणीपुरवठा १२ तासांवर आला आहे.
साधारणपणे शहराला दररोज ९० दशलक्ष लिटर पाणी लागते, ही मागणी आता वाढली आहे. शहराच्या वाढीव पाणीपुवठा योजनेसाठी ४४ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाठपुरावा केला, पण अजूनही लोकप्रतिनिधींनी जोर न दिल्याने योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही.
अंजनगाव सुर्जी, दर्यापूर या शहरांसह १५६ गावांसाठी आखण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत दोष निर्माण झाल्याने गावकऱ्यांना कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये तर दोन दिवसाआड पाणी मिळत आहे. यासंदर्भात अनेक गावांच्या सरपंचांनी जीवन प्राधिकरणामुळे पत्रव्यवहार केला आहे, पण दोष दूर झालेला नाही. वरूड तालुक्यातील १६ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना काही गावांनी वीजबिल भरण्यास नकार दिल्याने संकटात सापडली आहे. ही योजना २००२ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. सध्या १६ पैकी केवळ ४ गावांमध्ये पाणीपुरठा सुरू असून बेनोडा गावात या योजनेअंतर्गत पाण्याचा स्त्रोतच नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अचलपूर तालुक्यात अनेक गावांमधील बंद पडलेले हातपंप दुरुस्त केले जात नसल्याने गावकऱ्यांना दुरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. कुऱ्हा येथेही तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. काही भागात तर पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
अमरावती जिल्ह्य़ात भूजल पातळी गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच खालावत चालली आहे. जिल्ह्य़ातील ३ हजार ७०० गावांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विहिरी खोदण्यात आल्या. पाण्याच्या अतिवापरामुळे ३१६ गावे अतिशोषित, तर ५४ गावे शोषित वर्गवारीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यात वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील गावांचा समावेश आहे. वरूड तालुक्यातील १२५ गावे अतिशोषित वर्गवारीत समाविष्ट आहेत. जिल्ह्य़ातील अनेक भागात नियोजनाच्या अभावामुळे कृत्रिम पाणीटंचाई आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती, हातपंपांची दुरुस्ती ही कामे उन्हाळा सुरू होईपर्यंत पूर्ण न झाल्याने अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water shortage in amravati division
First published on: 16-04-2014 at 08:54 IST