उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना सोलापूर शहरातील पाण्याची समस्या कायम राहणार असून उन्हाळा असेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड याच पध्दतीने होणार आहे. पाणीसाठा मुबलक प्रमाणात असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे सोलापूरकरांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून आग्रहाने केली जात असली तरी प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही होणे तूर्त अशक्य असल्याचे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पाणीटंचाईचे पडसाद महापालिका स्थायी समितीच्या सभेत उमटले. शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड न झाल्यास महापालिकेच्या सर्व सभांवर बहिष्कार घालण्याचा इशारा स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी दिला आहे. तथापि, उद्या सोमवारी पालिका सर्वसाधारण सभा आयोजिली असून या सभेत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याने सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या सभेत सहभागी होण्याचे ठरविले आहे.
गेल्या आठवडय़ात काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांनी घेतलेल्या बैठकीत उजनी जलाशय ते सोलापूर थेट जलवाहिनी योजनेत प्रचंड प्रमाणात असलेली गळती दूर केल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु उजनी जलवाहिन्यांची गळती थांबविण्यात आली तरी पाणीपुरवठय़ात सुधारणा झाली नाही. या पाश्र्वभूमीवर पालिका स्थायी समितीच्या सभेचे कामकाज सभापती सय्यद बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होताच काँग्रेसचे चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे व भाजपचे सुरेश पाटील यांनी पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत, दोन दिवसाआड पाणीपुरवठा झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. मुबलक पाण्याचा साठा असताना केवळ ढिसाळ नियोजनामुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी त्रास कशासाठी, असा सवाल नरोटे व कोल्हे यांनी केला. काही प्रभागांमध्ये तब्बल सहा-सहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचीही ओरड या नगरसेवकांनी केली. सभापती बाबा मिस्त्री यांनी दुखवटय़ाचा प्रस्ताव मांडून सभा तहकूब केली. त्यामुळे पाणी प्रश्नावर या सभेत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे उद्या सोमवारी होणाऱ्या पालिका सर्वसाधारण सभेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, शहरातील पश्चिम भागात पाणीपुरवठा होत असताना भाजपचे नगरसेवक अविनाश पाटील यांनी रूपाभवानी मंदिराजवळील पाणी शेळगी येथे वळविले. त्यांच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने भाजपअंतर्गत नगरसेवकांमधील वाद चव्हाटय़ावर आला.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात उन्हाळा संपेपर्यंत तीन दिवसाआड पाणीपुरवठा
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना सोलापूर शहरातील पाण्याची समस्या कायम राहणार असून उन्हाळा असेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड याच पध्दतीने होणार आहे.
First published on: 05-05-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply after three days in solapur