कडक उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या हद्दीतील जंगलक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याचे काम जोरात सुरू असून आतापर्यंत ८३ लाख ६५ हजार रुपये पाणवठे निर्मितीसाठी खर्च करण्यात आले आहेत. विदर्भातील जंगलांमध्ये वनविकास महामंडळाच्या एकूण ५३ पाणवठय़ांवर वन्यजीव तहान भागवत असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
वनविकास महामंडळाने कुरणनिर्मिती, फळझाडे लागवड, बीजारोपण आणि पाळीव प्राण्यांच्या लसीकरणावरही चार लाख रुपये खर्च केले आहेत. महामंडळाच्या हद्दीतील कुरणांमध्ये चरणाऱ्या पाळीव प्राण्यांपासून वन्यजीवांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महामंडळाने लसीकरण मोहीम राबविली. यासाठी १९ खेडय़ांची निवड करण्यात आली होती. वनीकरणाच्या विविध कामांसाठी महामंडळाला वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाकडून २ कोटी ३१ लाख रुपये या वर्षी मंजूर झाले आहेत. यातून हा खर्च करण्यात आला, अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक आर.के. वानखेडे यांनी दिली.
महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या पाणवठय़ांमुळे उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. महामंडळाच्या अखत्यारीत नागपूर, भंडारा, गोंदिया, मध्य चांदा, पश्चिम चांदा, ब्रह्मपुरी, प्राणहिता, मरकडा आणि यवतमाळ येथील एकूण २ लाख ४८ हजार हेक्टर जंगलक्षेत्र येते. या जंगलक्षेत्रातील प्राण्यांसाठी आवश्यकतेनुसार पाणवठेनिर्मितीची मोहीम राबविण्यात आली. नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या जागांची निवड करून ते पाणी पाणवठय़ांमध्ये टाकण्याची व्यवस्थाही महामंडळाने केली आहे.