निखील मेस्त्री, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : जलजीवन अभियानांतर्गत पालघर ग्रामीण भागातील चार लाखांहून अधिक कुटुंबांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वैयक्तिक नळ पाणीपुरवठा करण्याचे ध्येय पालघर जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे. याअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ५५ लिटर शुद्ध पाणी विनाशुल्क देण्यात येणार आहे.

केंद्रपुरस्कृत असलेल्या पाणीपुरवठा योजना यांचे एकत्रीकरण करून जलजीवन मिशन अभियान  निर्माण करण्यात आले आहे.  यासाठी २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हे अभियान पालघर जिल्ह्यत राबविले जात आहे. चार वर्षांसाठीचा हा कार्यक्रम असून मार्च २०२४ पर्यंत   जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागात चार लाखांहून अधिक कुटुंबांना या अभियानअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे प्रशासकीय प्रकल्प संचालक तुषार माळी यांनी दिली आहे.   विभागामार्फत तांत्रिकदृष्टय़ा योजना पोचविण्याची विशेष जबाबदारी आहे. यासाठी विविध पातळीवर ग्रामस्तरीय क्षमता बांधणी, जनजागृती, जलशुद्धीकरण प्रशिक्षण, पाणी नमुने तपासणी आदींबाबत कर्मचाऱ्यांना सक्षम केले जाणार आहे.

आतापर्यंत ४२ हजार कुटुंबीयांना नळजोडणी

मार्च २०२१ पर्यंत एक लाख ५६ हजार ग्रामीण भागातील कुटुंबांना पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ४२ हजार कुटुंबांना जोडणी दिली गेली आहे. त्यामध्ये डहाणू   तीन हजार ५००, जव्हार  ६७१,  मोखाडा  ३१०, पालघर  १७,७१५, तलासरी ६८२, वसई- ७,१८३, विक्रमगड  ५२६, तर वाडय़ामध्ये  १,७५७ कुटुंबीय आहेत.

१०० दिवस विशेष अभियान कार्यक्रम

या विशेष अभियानांतर्गत प्राधान्यक्रमाने जिल्ह्यतील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाडय़ा, प्राथमिक-माध्यमिक  अनुदानित, आश्रमशाळा, विनाअनुदानित शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये अशा महत्त्वाच्या आस्थापनाना १०० टक्के शुद्ध पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी १५ वित्त आयोगाच्या निधीपैकी पन्नास टक्के निधी यासाठी वापरणे बंधनकारक आहे.

जिल्हा परिषदेच्या या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय आहे. त्यामुळे दूषित पाण्याच्या जलजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण होईल व आरोग्य अबाधित राहील.
सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर

सौर पाणीपुरवठा योजना

नळ पाणी पुरवठा योजना नसलेल्या, जिल्ह्यतील दुर्गम भागात २५० हुन कमी लोकसंख्या असलेल्या सुमारे ४५०० पाडय़ांमध्ये सौर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार आहे.

या ठिकाणी होणार नळ पाणीपुरवठा

प्राथमिक-माध्यमिक शाळा-      २८८४

अंगणवाडय़ा-           ३१८४

ग्रामपंचायत-            ४७३

पशुवैद्यकीय दवाखाने – ८५

प्रा.आरोग्य केंद्र-        ४६

उप आरोग्य केंद्र-      ३१२

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water through water tap dd70
First published on: 11-12-2020 at 00:02 IST