अलिबाग- वादळी वारे आणि पाऊस यामुळे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग मधील मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील जलवाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई ते मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते.
दररोज तीन ते साडेतीन हजार प्रवासी तर सुट्टीच्या दिवशी सात ते आठ हजार प्रवासी या या मार्गावरून प्रवास करत असतात. राज्यातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेला जलमार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. पावसाळ्यातील चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिने ही जलवाहतूक सेवा निरंतर सुरू असते.
बुधवारपासून किनारपट्टीवरील भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सोबत पाऊसही पडतो आहे. त्यामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे धोक्याची सूचना देणारा इशारा कोकण किनारपट्टीवर जारी करण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे जोवर वातावरण सुधारत नाही तोवर ही जलवाहतूक सेवा बंद ठेवण्यात येईल अशी माहिती जल प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्या आणि मेरीटाईम बोर्डाने दिली आहे. दरम्यान जलवाहतूक सेवा बंद पडल्याने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.
हवामान विभागाने किनारपट्टीवरील भागात धोक्याची सूचना देणारा तीन नंबरचा पावटा जारी केला आहे. त्यामुळे मांडवा बंदरातून होणारी जलवाहतूक थांबवण्यात आली आहे. हवामानात सुधारणा होत नाही आणि समुद्र शांत होत नाही तोवर बोटी सोडण्यात येणार नाही.- अमर पालवणकर बंदर अधिकारी मांडवा