Vaishnavi Hagawane baby: वैष्णवी हगवणे – कस्पटेच्या मृत्यू प्रकरणानंतर ज्या घडामोडी समोर येत आहेत, त्याने संबंध राज्याला धक्का बसला. ज्यादिवशी वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ आजी-आजोबांच्या ताब्यात आले, त्याक्षणीही अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर वैष्णवीच्या बाळाला आधी निलेश चव्हाण आणि त्यानंतर दुसऱ्या एका नातेवाईकच्या घरी ठेवण्यात आले होते. या काळात बाळाची हेळसांड झाली, असा आरोप कस्पटे कुटुंबाने केला होता. सध्या हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे असून या बाळात आता ते आपली मुलगी शोधत आहेत.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना वैष्णवीच्या पालकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वैष्णवीच्या मृत्यूचे दुःख पचवून त्यांची आई आता बाळाची काळजी घेत आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना स्वाती कस्पटे म्हणाल्या, रोज सकाळी उठून बाळाला पेच बनवणे, त्याला खाऊ घालणे, आंघोळ घालणे असा दिनक्रम सुरू झाला आहे. जेव्हा बाळ आमच्याकडे सुपूर्द करण्यात आले, तेव्हा त्याची तब्येत खालावली होती. आम्ही चेकअप केले तेव्हा त्याचे वजन खूप कमी झाल्याचे कळले.

वैष्णवीला आम्ही बाळात पाहत आहोत

“बाळाचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांच्या देखरेखीखाली त्याचे चेकअप करण्यात आले होते. मागच्या काही दिवसांत त्याची उत्तम काळजी घेतल्यामुळे प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत आहे. माझी वैष्णवी म्हणून आम्ही आता बाळाचा सांभाळ करणार आहोत”, असे वैष्णवीच्या आई-वडिलांनी सांगितले.

दरम्यान २२ मे रोजी म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर जवळपास सहा दिवसांनी हे बाळ कस्पटे कुटुंबियांना मिळाले. त्याआधी त्यांनी बाळाचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नाही. २२ मे रोजी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून बाणेर येथील महामार्गावर त्यांना बोलावून बाळ ताब्यात दिले. वैष्णवीच्या काकांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेर येथील हायवेवर ते बाळ आमच्या ताब्यात दिले. तो व्यक्ती आमच्या ओळखीचा नव्हता. त्याने आम्हाला फोन केला आणि बाळ आमच्याकडे दिले. आम्हीही चौकशी केली नाही. तो व्यक्ती निघून गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल

दरम्यान वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ करीष्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांचा मित्र निलेश चव्हाणच्या ताब्यात होते. कस्पटे कुटुंबियांनी त्याच्याकडून बाळ मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पिस्तूल दाखवून कस्पटे कुटुंबियांना धमकावले, असा आरोप करण्यात आला. यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाणवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्याचा शोध सुरू आहे.