तत्त्वज्ञान या विषयावर डॉ. शरद बाविस्कर यांनी त्यांची रोखठोक मतं मांडली आहेत. लोकसत्ता लिट फेस्ट या कार्यक्रमात त्यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांनी तत्त्वज्ञान हे किती सोपं आहे तसंच भारतात आणि पाश्चात्य देशांमध्ये याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? याबाबत भाष्य केलं.
आपल्याकडे तत्त्वज्ञानाबाबत अनेक गैरसमज-बाविस्कर
आपल्याकडे तत्त्वज्ञानाविषयीचे बरेच गैरसमज आहेत. यासाठी तत्त्वज्ञानाची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली होती ते जबाबदार आहेत. कारण एकामागून एक तत्त्वज्ञानाचे विभाग बंद पडले आहेत. विद्यापीठात बसलेला स्क्रू ढिला झालेला माणूस म्हणजे तत्त्वज्ञानाचा माणूस अशी प्रतिमा का तयार झाली? पाश्चात्य देशांमध्ये तत्त्वज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तत्त्वज्ञानामध्ये चिरकालीक आणि तात्कालीक अशा उभ्या आणि आडव्या रेषा असतात. कुणीही पूर्णपणे चिरकालीक असू शकत नाही आणि कुणीही पूर्णपणे तात्कालीक असू शकत नाही. तत्त्वज्ञान म्हणजे प्रत्येक माणसाकडे परिस्थितीविषयीचं एक तात्कालीक भान असतं, आकलन असतं. चिरकालीक विषयीही ते असतं. पण दोन्ही बिंदू असावे लागते. जे फक्त चिरकालीक असतात ते मठाधिपती असतात आणि तात्कालीक म्हणजे जे राजकारणी सध्या दिसत आहेत ते तात्कालीक, त्यांचं चिरकालीक काय ते कळत नाही. कारण त्यांचा अजेंडा लक्षात येतो. असं डॉ. शरद बाविस्कर यांनी म्हटलं आहे. लोकसत्ता लिट फेस्टमध्ये त्यांची मुलाखत अभिजित ताम्हाणे यांनी घेतली त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला जे कळतं ते
पुढे शरद बाविस्कर म्हणाले, “तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगाचं झालं तर मी जर जड शब्द वापरला जसं की ज्ञान मीमांसा तर आपल्याला जे कळतं आहे ते. ते किती सदोष आहे त्यालाच मीमांसा म्हटलं जातं. माझं आकलन कसं झालं आहे ते या मीमांसेवरुन कळतं. तसंच सद्वस्तू मीमांसा हा शब्द उच्चारला तर मुलं निघून जातील. सोपं करुन सांगायचं झालं तर ते म्हणजे हे आहे. का जाणून घ्यायचं असेल तर जीवन समृद्ध करण्यासाठी. हे सगळं मी एकाच वेळी जड शब्दांतही सांगतो आणि सोप्या भाषेतही सांगू शकतो. एखाद्या भाजी विकणाऱ्या अहिराणी मावशींपाशी मी बसलो तर तिला मी फ्रेंच तत्त्वज्ञान अहिराणी भाषेत समजावून सांगू शकतो. विनाकारण गोष्टी दुर्बोध का केल्या जातात मला माहीत नाही. बऱ्याचदा संकल्पनात्मक भाषा न वापरता सोपं करुन सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण सांगत असतो त्याविषयी भान असणं हे महत्त्वाचं असतं.”
हेगल यांचे विचार योग्यच आहेत-शरद बाविस्कर
अनेक गोष्टी घडल्यानंतरच आपल्याला कळतात. ज्ञानाची घुबडं जीवनाच्या संध्याकाळीच उडतात हे हेगल यांनी म्हटलं आहे. पाश्चात्य देशांत तत्त्वज्ञान हा विषय महत्त्वाचा आहे. या विषयाला मानाचा दर्जा आहे. बारावीच्या परीक्षेत पहिला पेपर तत्त्वज्ञानाचा असतो. आपल्या भाषेतील ज्ञानव्यवहार याला तत्त्वज्ञानाची बैठक नसेल तर आपण काय उसनवारी दिसणार आहे. त्यामुळे टोकाची आत्मग्लानी दिसते. ती आंग्ल शिक्षित मित्रांना लाज वाटते. ते असे असतात ज्यांना हिंदी किंवा मराठीही नीट येत नाहीत. चेतन भगत वाचणं म्हणजे इंग्रजी वाचणं नाही असंही मत शरद बाविस्कर यांनी मांडलं
