एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह यावरून दोन गटात वाद सुरू आहे. याआधीच निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असेल, असा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचं याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. असं असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

तांत्रिक अडचण आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर (कमळ) निवडणूक लढवू, असं विधान किशोर पाटील यांनी केलं. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसं सांगतील तसाच निर्णय आम्ही घेऊ, असंही किशोर पाटील म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- अजित पवारांच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवरही केलं भाष्य, म्हणाले…

यावेळी किशोर पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ आमचीच आहे, हे सिद्ध झालं आहे. हे निवडणूक आयोगानंही जाहीर केलं आहे. त्यामुळे ९९.९ टक्के भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची आमच्यावर वेळ येणार नाही. पण जर तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर कदाचित तसा निर्णय होऊ शकतो.”

हेही वाचा- “…तर आम्ही कधीही सहन करणार नाही”, शरद पवार-अजित पवार भेटीवरून नाना पटोलेंचा सूचक इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे यांनी जर उद्या सांगितलं की, आपल्या सर्वांना अपक्ष निवडणूक लढायची आहे, तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आपल्याला भाजपाकडून लढायचं आहे, तर आम्ही भाजपाकडून लढू. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसं सांगतील, तसंच सगळं होईल”, असंही किशोर पाटील म्हणाले.